मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी फिरविली सीसीआय खरेदीकडे पाठ
अनेक शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे पांढरं सोनं
ज्योतिबा पोटे, मारेगाव: शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला शासन कवडीमोल भाव देत आहे. तसंच सीसीआय खरेदी केंद्रावर होत असलेली भावासंदर्भात तफावत यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे येथे सुरू असलेल्या कापूस खरेदी केंद्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. सीसीआयमार्फत केवळ सात क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.
या वर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस पडल्याने कापूस निघण्याच्या हंगामात फरक पडला आहे. परिणामी शेतातील कापुस वेचनीसाठी मजुराची टंचाई भासली. वेचाईचे दर वाढले, पर्यायाने कापसाचा उत्पन्न खर्च वाढला. परंतु शासनाची खरेदी संदर्भातील धोरण हे शेतक-यांच्या हिताचं असल्याचं कुठेच दिसून येत नाही. कापूस खरेदी केंद्रावर प्रथम पाटीभाव एक व नंतर कापसातील ओलाव्याच्या कारण समोर करीत ठरलेल्या भावात कपात करण्याच्या व्यापाऱ्यांच्या षडयंत्राने शेतकऱ्याची सर्रास लुट होत असल्याचं दिसून येत आहे.
शेतकऱ्यांच्या या समस्येकडे कृषी संदर्भातातील लोकप्रतिनिधीनी दुर्लक्ष केले असल्याने आता शेतकर्यांचा वाली उरला नाही असी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठ्या कष्टाने पिकवलेल शेतकर्यांचं पांढरं सोनं कवडीमोल भाव मिळत असल्याने घरीच पडून आहे.
मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी कापसाची आवक, अत्यल्प पाऊस, गुलाबी बोंड अळीचा प्रकोप त्यामूळे कापसाचे उत्पन्न घटले असल्याचं बोललं जात असुन, मारेगाव तालुक्याची पीक आनेवारी मात्र शासनाच्या सर्वेक्षणानुसार ५०% एव्हडी दाखविण्यात येत असल्याने शेतकर्यांना शासकिय आर्थिक मदत मिळण्याची आशा सुद्धा मावळली आहे.
मारेगाव तालुक्यातील अयफाज जिनिंग, मारेगाव विनायक कोटेक्स, नवशक्ती जिनिंग मार्डी, वर्धमान कोटेक्स, गोविंदराज कोटेक्स असे कापूस खरेदी केन्द्रे असून आज पर्यंत या कापूस खरेदी केन्द्रात केवळ ३२७४२ क्विंटलचीच खरेदी झाली आहे. यावरून या वर्षी कापसाच उत्पन्न घटल्याचं स्पष्ट होत आहे.