बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील एका शेतमजूर दांपत्याच्या तीन अल्पवयीन अपत्यांना फूस लावून पळवून नेले होते. अपहरण करणा-या आरोपीला एलसीबी पथकाने वर्धा जिल्ह्यातून अटक केली. 19 सप्टेंबर रोजी मारेगाव तालुक्यातील एका शेतशिवारात शेतमजुरी करणाऱ्या दांपत्याची तीन अल्पवयीन मुले — एक मुलगी (वय ९) आणि दोन मुले — फूस लावून पळवून नेण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी देविदास अंगदास वावरे (वय ४४) हा मुळचा पांढरकवडा येथील रहिवासी असून त्याच्यावर नागपूर व तेलंगणात गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहिती नुसार, दिनांक 1 नोव्हेंबरपासून जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली अपहरण झालेल्या18 वर्षांखालील मुला–मुलींचा शोध घेण्यासाठी “ऑपरेशन शोध” मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू होता. 3 नोव्हेंबर रोजी गुप्त माहितीदाराकडून एलसीबी पथकाला माहिती मिळाली की आरोपी वावरे हा तिन्ही अल्पवयीन मुलांसह किनगाव (ता. हिंगणघाट, जि. वर्धा) येथे लपून राहत आहे.
पथकाने तत्काळ वरिष्ठांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तत्काळ वर्धा जिल्ह्यात रवाना झाले. त्यांनी आरोपीला किनगाव येथून शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या तिन्ही मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली. नंतर मुलांना मारेगाव येथे आणून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीला पुढील तपासासाठी मारेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
काय आहे हे प्रकरण ?
तक्रारदार दांपत्य निशानघाट (जि. आदिलाबाद) येथे काम करत असताना त्यांची आरोपी देविदास वावरे याच्याशी ओळख झाली होती. सध्या हे दाम्पत्य मारेगाव तालुक्यातील एका शेतशिवारात सालगडी म्हणून काम करतात. ते तीन बालकांसह राहत होते. 19 सप्टेंबर रोजी आरोपी शेतशिवारात आला. “मुलांचे चांगले पालन-पोषण व शिक्षण करतो” अशा भुलथापा देत त्याने तिघांचेही अपहरण केले होते. दाम्पत्य घरी आल्यावर त्यांना मुलं आढळले नाहीत. अखेर त्यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर कारवाई ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे (वणी विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पो.नि. सतीश चवरे, सपोनि. दत्ता पेंडकर, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, पोहवा सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सलमान शेख, रजनिकांत मडावी आणि चालक नरेश राऊत यांनी मोलाची भूमिका बजावली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण सुळे हे करीत आहेत.



Comments are closed.