तारीख ठरली 2 डिसेंबर… निवडणुकीचे बिगुल वाजले
आचारसंहिता लागू... लक्ष युती-आघाडीकडे.. कोण मारणार बाजी?
बहुगुणी डेस्क, वणी: अखेर चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यंदा 42 नगरपालिकांमध्ये निवडणूक होणार असून वणी नगरपालिकेचाही त्यात समावेश आहे. वणीत 2 डिसेंबर रोजी मतदान होईल आणि 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. अर्ज परत घेण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर आहे. अर्ज छानणी 18 नोव्हेंबरला होईल. अपील नसलेल्या ठिकाणी अर्ज माघारी घेण्याची तारीख 21 नोव्हेंबर आहे. आक्षेप असल्यास ही मुदत 25 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. उमेदवारांची अंतिम यादी 26 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल व याच दिवशी चिन्ह वाटप होणार आहे.
वणी नगरपालिकेच्या मतदार यादीत एकूण 49,556 मतदारांची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदार 24,598, महिला मतदार 24,958, आणि अन्य 1 मतदाराचा समावेश आहे. वणीत एकूण 14 प्रभाग असून सदस्यांची संख्या 29 आहे. प्रभाग क्रमांक 1 ते 13 मध्ये प्रत्येकी एक पुरुष व एक महिला सदस्य निवडले जातील, तर प्रभाग क्रमांक 14 मध्ये तीन सदस्य असतील. निवडणूक जाहीर होताच सर्वच पक्षाच्या कामाला वेग येणार आहे.
आचारसंहिता लागू… लक्ष युती-आघाडीकडे
वणीतील राजकीय वातावरण गेल्या काही काळापासून तापलेले आहे. अनेक पक्षांनी अद्याप आपले पत्ते उघडले नव्हते, मात्र निवडणुकीच्या घोषणेनंतर आता राजकीय हालचालींना वेग येणार आहे. वणी नगरपालिकेत भाजप, शिवसेना, काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, बसपा हे प्रमुख पक्ष आहेत. तसेच अनेक अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. युती-आघाडीबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी निवडणुकीच्या तारखेने सर्वांचे लक्ष त्या दिशेने लागले आहे.



Comments are closed.