मारेगावच्या एमआयडीसीकडून बेरोजगारांची अवहेलना
लोकप्रतिनिधीचे बेरोजगाराच्या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष
ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव शहरा पासुन दोन किमी अंतरावर घोन्सा रोडवर एम.आय.डी.सीचा फलक गेल्या 25-30 वर्षा ंपासून लागला आहे. मात्र लोकप्रतिनिधीच्या अकार्यक्षम कार्यप्रणालीने अजून पर्यंत तिथे उद्योग तर सुरु झालेच नाही, शिवाय तिथे शेतकरी शेती करीत असताना तिथे दिसत आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या जागेच्या क्षेत्राचे काय झाले, हा प्रश्न आजही अधांतरीच आहे.
मारेगाव तालुक्यात उद्योगाची कमतरता आहे. विकासाच्या बाबतीत मागासक्षेत्र म्हणून ख्याती आहे. गेल्या तीस वर्षापूर्वी शासनाने तालुक्यातील बेरोजगारीचा प्रश्न निकाली निघावा म्हणून येथील घोन्सा रोडवर एम.आय.डी.सी.चा फलक लावला. मात्र गा फलक बेरोजगारांना वाकुल्या दाखविण्याचम काम करीत आहे. गेल्या पंचविस तीस वर्षांत पाच सहा आमदार झाले असुन ते सर्व लोकप्रतिनिधी स्वहिताचेच धनी बनले.
बेरोजगारी दूर व्हावी, परिसराचा औद्योगिक विकास व्हावा, यासाठी शासनाकडून जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण दिलं जाते. तालुक्यात अनेक बेरोजगारांनी हे प्रशिक्षण केले आहे. तसंच अनेकांना त्याचा व्यवसाय उद्योगात परावर्तीत करायचा आहे. माच्र एकही प्रकल्प मारेगाव तालुक्यात सुरु न झाल्याने बेरोजगारीचा प्रश्न कायम आहे.
आजच्या घडीला लावलेला एमआयडीसीचा फलक सडलेल्या अवस्थेत असुन, ज्यांच्या जमिनी एमआयडीसीत गेल्या त्यांना मोबदला मिळाला नाही काय ? हा सुध्दा प्रश्न उपस्थित होत आहे.