मारेगाव नगरपंचायत निवडणूक: काँग्रेसच्या पराभवाचे खापर कुणाच्या डोक्यावर
काय होती नगराध्यक्षपदाच्या वादाची पार्श्वभूमी? काँग्रेसचे पराभूत उमेदवार नंदेश्वर आसुटकर यांचाही गेम?
तालुका प्रतिनिधी, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मारेगाव तालुक्यातील काँग्रेसमध्ये असलेली कुरबुरी व कुरखोडी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. सर्वात जास्त संख्याबळ असूनही पालिकेत सत्ता आणण्यात तालुक्यातील व विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ धुरंधर, मुसद्दी राजकारणी फेल झाले. त्यामुळे हा त्यांचाही पराभव मानला जात आहे. अद्यापही काँग्रेसचे सर्वसामान्य कार्यकर्ते यातून सावरले नाहीत. तर दुसरीकडे पक्षांतर्गत असलेली नाराजी, कुरघोडी, नेतृत्व उदय, खच्चीकरण असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मात्र तोंडाशी आलेला घास गेल्याने यात कोणी कोणाची जिरवली यापेक्षा पक्षाचे किती नुकसान झाले याची चाचपणी करणे काँग्रेसच्या तालुक्यातील नेत्यांनी करणे गरजेचे आहे. सध्या काँग्रेसमध्ये पराभवाचे खापर एकमेकांवर फोडणे सुरू झाले आहे.
मारेगाव नगरपंचायतच्या अध्यक्षपदासाठी दि. 14 फेब्रुवारीला निवडणूक पार पडली. यामध्ये काँग्रेस पक्षाकडून अपक्ष निवडून आलेले नंदेश्वर आसुटकर, शिवसेनेतर्फे डॉ. मनीष मस्की व भाजपतर्फे हर्षा अनुप महाकुलकर यांनी नामांकन दाखल केले होते. काँग्रेसचा विचार केल्यास काँग्रेस 5, मनसे 2, राष्ट्रवादी काँग्रेस 1 आणि अपक्ष 1 असे 9 सभासद त्यांच्याजवळ होते. भाजपाचे 4 आणि शिवसेनेचे 4 असे पक्षीय बलाबल होते. मात्र ऐनवेळी भाजपने सेनेला पाठिंबा देण्याचे ठरवले. वरकरणी काँग्रेस कडून असलेले नंदेश्वर आसुटकर यांचा विजय सुनिश्चीत वाटत होता. मात्र काँग्रेसचे दोन सदस्य हे विरोधात गेल्याने काँग्रेस पक्षाचा पराभव झाला.
नगराध्यक्षपदाच्या वादाची पार्श्वभूमी…
दीड वर्षाआधी नगरपंचायत निवडणुकीच्या आधी तालुक्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किन्हेकर यांनी पक्षातून बाहेर पडून स्वराज्य युवा शेतकरी संघटना स्थापन केली. संघटनेच्या नावात ‘युवा’ असल्याने या संघटनेचा उद्देश त्यांचा पुतण्या विशाल किन्हेकर यांना नेतृत्त्व म्हणून पुढे आणण्याचा असल्याचे स्पष्ट दिसून येत होते. ऐन नगरपंचायत निवडणुकीच्या आधी या संघटनेने काँग्रेसमध्ये विलिन होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी काही मागण्याही पदरात पाडल्या. त्यात नगरपंचायतीच्या जागाही होत्या.
नगरपंचायत निवडणुकीच्या जागा वाटपात गजानन किन्हेकर यांचा पुतण्या विशाल किन्हेकर यांना प्रभाग क्रमांक 3 मध्ये तर गजानन किन्हेकर यांच्या पत्नी सुनिता किन्हेकर यांना प्रभाग क्रमांक 10 मध्ये काँग्रेसतर्फे तिकीट देण्याचे ठरले. हीच या सर्व नाट्यपूर्ण घडामोडीची नांदी असल्याचे बोलले जाते. सेना सोडल्याने आजही त्या नेत्याकडे शिवसेनिकांचा पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. त्यामुळे पक्ष सोडून गेलेले निवडून येणार नाही याची काळजी सेना घेते. हा सेनेचा संपूर्ण राज्यातील इतिहास आहे.
प्रभाग क्रमांक 3 ठरला प्रतिष्ठेचा…
निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये असलेले व सोबतच नगरसेवक नंदेश्वर आसुटकर यांना त्यांचा मतदारसंघ राखीव होण्याची कल्पना होती. त्यामुळे त्यांनी पर्यायी मतदारसंघ म्हणून निवडणुकीच्या दीड वर्षाआधीपासूनच प्रभाग क्रमांक 3 बांधण्यास सुरुवात केली होती. अपेक्षे प्रमाणे आसुटकर यांचा प्रभाग महिला राखीव झाला. त्यामुळे त्यांनी काँग्रेसतर्फे प्रभाग क्रमांक 3 साठी दावेदारी केली. विशाल किन्हेकर यांनीही या प्रभागासाठी दावेदारी केली. एकाच प्रभागात दोन दावेदारी आल्याने काँग्रेसची चांगलीच गोची झाली. मात्र संघटना विलिनिकरणाच्या आधीच किन्हेकर यांनी ज्या जागा मागितल्या होत्या त्यातील एक ही प्रभाग क्रमांक 3 ही होती. त्यामुळे शब्द पाळत काँग्रेसने ही जागा विशाल किन्हेकर यांना दिली. तर नंदेश्वर आसुटकर यांची निराशा झाली. मात्र गेल्या दीड वर्षांपासून हा प्रभाग आसुटकर यांनी बांधला असल्याने त्यांना या प्रभागातून विजयाची खात्री होती. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उभे राहण्याचा निश्चय केला.
प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनेक धुरंधर व संघटनेचे मोठे पदाधिकारी असल्याने या प्रभागाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. काँग्रेसकडून बंडखोरी झाल्याने काँग्रेसचे मत विभागले गेले. त्यातच आसुटकर यांनी राजकीय डावपेच आखत काँग्रेसच्याच अनेकांना आतून सोबत घेतले. पालिकेचा अनुभव असल्याने लोकांचाही पाठिंबा त्यांना मिळाला व त्यांनी या प्रभागातून एकतर्फी विजय मिळवला. या प्रभागात राष्ट्रवादी दुस-या क्रमांकावर तर ज्यासाठी सर्व घडले ते विशाल किन्हेकर हे तिस-या क्रमांकावर राहिले. पक्ष सोडल्याने सेना आणि नुकतेच काँग्रेसवासी झाल्याने काँग्रेस या दोघांनाही विशाल किन्हेकर निवडून आलेले नको होते. त्यामुळेच अपक्षाचा विजय सुकर झाला, असे देखील बोलले जात आहे.
नगर पंचायत निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने नगराध्यक्ष पदासाठी मारेगावात खिचडी होणार हे स्पष्ट होते. मात्र काँग्रेस पक्ष श्रेष्ठीकडून महाविकास आघाडी तर सेनेच्या पक्षश्रेष्ठींकडून नगराध्यक्ष आपलाच हवा असा आदेश आल्याचे कळते. त्यानुसार सेनेने भाजपसोबत हातमिळवणी केली. मात्र तरीही त्यांना 1 जागा हवी होती व काँग्रेसचे मत फोडण्याची गरज होती. नंदेश्वर हे अपक्ष जरी निवडून आले असले तरी त्यांची नगराध्यक्ष पदाची मनिषा कायम होती. शिवाय त्यांना नगरपालिकेचा अनुभवही होता. आसुटकर यांनी आपला राजकीय अनुभव कामी लावत मनसे व राष्ट्रवादीला सोबत घेतल्याची चर्चा आहे. मात्र आसुटकर यांनी हा प्रस्ताव ठेवला की मनसेने काँग्रेसकडे उपाध्यक्ष पद मागत पाठिंबा द्यायचे ठरवले हे खात्रीलायक सांगता येत नाही.
आसुटकर यांनी काँग्रेसजवळ नगराध्यक्ष पदाची मागणी केली. मात्र एका बंडखोर उमेदवाराला थेट नगराध्यक्ष करणे सोपे नव्हते. म्हणून त्यांनी तालुका व मतदारसंघातील बड्या नेत्यांकडून फिल्डिंग लावणे सुरू केले. पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते म्हणून त्यांच्या नावाला फारसा विरोध झाला नाही.
काँग्रेसमध्येही गेम !
काँग्रेसने पक्षातीलच एखाद्या नगरसेवकाला नगराध्यक्ष पद न देता ते एका बंडखोर उमेदवारांला दिल्याने पक्षांतर्गत नाराजी सुरू झाली. त्यामुळे मत फुटण्याची शक्यता व दुसरीकडे सेना व भाजप एकत्र येऊ शकते याची कल्पना काँग्रेसला नव्हती असे म्हणता येत नाही. ही शक्यता मीडियामधूनही वर्तवण्यात आली होती. (सर्वप्रथम ‘वणी बहुगुणी’नेच ही शक्यता वर्तवली होती) त्यामुळे काँग्रेस गाफिल होती असं म्हणणे संयुक्तिक होणार नाही. नंदेश्वर आसुटकर यांचे वाढलेले प्रस्थ, अपक्ष म्हणून निवडून येणे, त्यांची नगराध्यक्ष पदासाठी दावेदारी, तालुक्यात भावी नेतृत्व म्हणून पुढे येणे अशा शक्यतेमुळे सेना-भाजप युतीची कल्पना असूनही याकडे दुर्लक्ष करून आसुटकर यांचा मुद्दाम गेम करण्यात आल्याची चर्चाही शहरात सध्या चांगलीच रंगली आहे.
या सर्व घडामोडीमध्ये कुणी जिंकले, कुणी हरले तर कुणी हरूनही जिंकले. मात्र एक पक्ष म्हणून काँग्रेसची चांगलीच नाचक्की झाली आहे व यात पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यात काँग्रेस पक्षाने याचे चिंतन करण्याची गरज आहे. (क्रमश:)
(दुस-या भागात आणखी काही नवे…)
Comments are closed.