मारेगाव नगर पंचायत निवडणूक: चुरशीच्या निवडणुकीने वाढवली मतदानाची टक्केवारी

निवडणुकीत 81 % मतदान, टक्केवारीने वाढवली उमेदवारांची धाकधूक

भास्कर राऊत, मारेगाव: आज मारेगाव नगरपंचायत निवडणुकीचे मतदान अत्यंत चुरसपूर्ण वातावरणात पार पडले. मतदान होते वेळी अनेक ठिकाणी संघर्षपूर्ण वातावरण पहावयास मिळाले. अनेक ठिकाणी तर प्रकरण हातघाईवर येते की काय असेही वाटून गेले. या संघर्षपूर्ण निवडणुकीमध्ये वाढलेला मतदानाचा टक्का उमेदवाराच्या ह्रदयाचा ठोका मात्र वाढवून गेल्याचे दिसून येत आहे. मतदानाची एकूण टक्केवारी 80.99 असून यात पुरूष मतदारांची टक्केवारी 81.40% तर महिलांची टक्केवारी 80.57 % आहे.

मारेगाव नगरपंचायतच्या निवडणुकीचे आज दि. 21 डिसेंबरला मतदान पार पडले. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचीत आघाडी, इतर आघाडी व अपक्ष असे समीकरण या निवडणुकीत पहावयास मिळाले. या निवडणुकीचा प्रचार सुरू असतांना वेगवेगळे किस्से सुद्धा पहावयास मिळाले. आज एकासोबत, उद्या दुसऱ्यासोबत तर परवा तिसऱ्यासोबत अशी परिस्थिती प्रचारादरम्यान अनुभवास मिळत होती. आज मतदानादरम्यान तणावपूर्ण शांतता पहावयास मिळाली.

काही ठिकाणी मतदारांना जबरदस्तीने उचलून नेऊन मतदान करावयास लावल्याचे चित्र दिसत होते तर काही ठिकाणी मतदारांना वेगवेगळी आमिषणे देऊन लुभावण्याचे प्रयत्न सुरू होते. उमेदवार मतदान सक्तीने करून घेत असल्याने मतदानाची टक्केवारी वाढणार हे निश्चीत होते. परंतु ही वाढणारी मतदानाची टक्केवारी कोणाची डोकेदुखी वाढवणार हे आता मतमोजणीच्या दिवशीच कळणार असल्याने उमेदवारांची धाकधूक वाढलेली असल्याचे दिसून येत आहे. मतदानाचा वाढलेला टक्का हा कोणाला डोकेदुखी ठरते हे येणाऱ्या काळात लक्षात येईलच.

मारेगाव नगरपंचायत मध्ये 5244 मतदारापैकी एकूण 4247 मतदान झाले. यात प्रभाग क्रमांक 1 मध्ये एकूण मतदान 347 असून यापैकी 286 मतदान झाले. यात 137 पुरुष आणि 149 महिलांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये एकूण 377 मतदान असून 322 मतदान झाले. यात 168 पुरुष आणि 154 महिला आहेत. प्रभाग क्रमांक 3 मध्ये एकूण मतदान 422 असून यापैकी 364 मतदान झाले. यात 179 पुरुष आणि 185 महिला आहेत. प्रभाग क्रमांक 4 मध्ये एकूण मतदान 407 असून यांपैकी 352 मतदान झाले. यात 173 पुरुष 179 महिला आहेत. प्रभाग क्रमांक 7 मध्ये एकूण 432 आहेत. यापैकी 338 मतदान झाले. यात 176 पुरुष आणि 167 महिलांचा समावेश आहे.

प्रभाग क्रमांक 8 मध्ये 356 मतदान असून यापैकी 280 मतदान झाले . यात 125 पुरुष आणि 155 महिला आहेत. प्रभाग क्रमांक 9 मध्ये एकूण 463 मतदान असून यापैकी 393 मतदान झाले. यात 202 पुरुष आणि 191 महिला आहेत. प्रभाग क्रमांक 10 मध्ये एकूण 294 मतदान असून यापैकी 261 मतदान झाले. यात 131 पुरुष आणि 130 महिला आहेत. प्रभाग क्रमांक 11 मध्ये एकूण 394 मतदान असून यापैकी 317 मतदान झाले. यात 149 पुरुष आणि 168 महिला आहेत. प्रभाग क्रमांक 12 मध्ये एकूण 369 मतदार असून यापैकी 299 मतदान झाले. यात 164 पुरुष आणि 135 महिला आहेत.

प्रभाग क्रमांक 13 मध्ये एकूण 270 मतदार असून यापैकी 196 मतदान झाले. यात 100 पुरुष आणि 96 महिला आहेत. प्रभाग क्रमांक 15 मध्ये एकूण 338 मतदार असून यापैकी 233 मतदान झाले. यात 120 पुरुष आणि 113 महिला आहेत. प्रभाग क्रमांक 16 मध्ये एकूण 398 मतदार आहेत. यापैकी308 मतदान झाले. यात 164 पुरुष आणि 144 महिला आहेत. प्रभाग क्रमांक 17 मध्ये एकूण मतदार 377 मतदार आहेत. यापैकी 286 मतदान झाले. यात 152 पुरुष आणि 141 महिला आहेत.

Comments are closed.