बहुगुणी डेस्क, वणी: एका छोट्याशा फोन कॉलने घरातील शांतता भंग पावली आणि एका महिलेच्या वाटेला शारीरिक-मानसिक छळ आला. “तू नेहमी मोबाईलवर का बोलते? तुझे दुसऱ्याबरोबर काय चालू आहे?” असा संशय घेऊन पती नेहमी पत्नीला शिवीगाळ करायचा. तर सासू हुंड्यासाठी छळ करायची. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात पती व सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी महिला (वय 26) ही मोमिनपूरा, वणी येथील रहिवासी आहे. तिचे हिंगणघाट, जि. वर्धा येथील एका तरुणाशी मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे 2016 मध्ये लग्न झाले. त्यांना एक मुलगा (8) देखील आहे. लग्नानंतर सुरुवातीला पत्नीला चांगली वागणूक मिळाली, पण नंतर पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी तिला शिवीगाळ करत भांडण करायचा. “दुसरे लग्न करतो” अशी धमकी द्यायचा. सासू (वय 60) ही देखील पतीला भडकवत असे. “माहेरून पैसे आण” असा तगादा लावून तिच्यावर शारीरिक व मानसिक छळ केला जात होता.
अखेर मुलाच्या जन्मानंतर काही महिन्यातच पत्नी माहेरी परत आली. ती 7 वर्षांपासून माहेरीच राहत होती. एप्रिल 2025 मध्ये नातेवाईकांच्या मध्यस्थी बैठकीनंतर दोघांत समेट झाला. पत्नी व मुलाला घेऊन पती हिंगणघाट येथे गेला. मात्र अवघ्या काही दिवसात मोबाईलवर बोलण्यामुळे पत्नीला पुन्हा देणे सुरु झाले. 15 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पत्नी ही तिच्या मोबाईलवर आईशी बोलत होती. दरम्यान पती आला व तो तिच्यावर संशय घेऊ लागला. “तुझे दुसऱ्याबरोबर काय चालू आहे?” असा आरोप करून तिला शिवीगाळ केली.
घटनेनंतर पत्नीला तिच्या भावाला फोन करून सांगितले. दुसऱ्या दिवशी तिचा भाऊ तिला माहेरी घेऊन गेला. त्यानंतर पती व सासूविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. प्रकरण समेटासाठी महिला समेट कक्षाकडे गेले. तिथे पत्नीने दोघेही वणी येथे राहू असा प्रस्ताव ठेवला. मात्र पतीने “वणी येथे राहणार नाही, हिंगणघाट येथे सासरी राहा आणि मोबाईलवर जास्त बोलू नको” असा अट्टाहास केला. अखेर समेट न झाल्याने वणी पोलीस ठाण्यात पती व सासूच्या विरोधात बीएनएस कलम 85 व 3(5) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.





Comments are closed.