संस्थेला जागा देण्यावरून नगराध्यक्ष आणि आमदार ‘आमने-सामने’

कोट्यवधींची जमीन संस्थेच्या घशात जाऊ देणार नाही- आ. बोदकुरवार.... असा गुन्हा मी वारंवार करणार - तारेंद्र बोर्डे

जितेंद्र कोठारी, वणी: नगर परिषदेचा कार्यकाळ संपुष्टात येत असताना एका वादग्रस्त ठरावावरून येथील आमदार आणि नगराध्यक्ष यांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले आहे. नगरपरिषदच्या मालकीची तब्बल 20 हजार स्क्वेअर फूट जागा यवतमाळ येथील एका संस्थेच्या अनाथालयासाठी तसेच केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनला देण्याचा ठराव नगर पालिकेच्या सभेत मंजूर करण्यात आला. या ठरावाला भाजपच्याच काही नगरसेवकांनी विरोध केल्याने हा ठराव वादग्रस्त ठरला होता. मात्र आता आमदारांनी एका अपरिचित संस्थेच्या घशात कोट्यवधींची जमीन जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतल्याने आगामी काळात नगराध्यक्ष विरुद्ध आमदार असा वाद रंगण्याची चिन्ह दिसत आहे.

यवतमाळ येथील एका संस्थेने अनाथालयासाठी वणी नगर पालिका हद्दीतील जागा मागितली होती. त्यानुसार 20 हजार स्क्वेअर फूटची जागा अनाथालय आणि केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनला देण्याचा ठराव दि. 20 डिसेंबरच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला. वणी नगर परिषदमध्ये भाजपचे बहुमत असल्यामुळे ठराव मंजूर करण्यात आला. मात्र अपक्ष नगरसेवक पी.के. टोंगे, राजू भोंगळे सह सत्ताधारी भाजपचेच नगरपरिषद उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, नगरसेवक राकेश बुग्गेवार आणि आरती वांढरे यांनी ठरावाचा विरोध केला. त्यानंतर आता भाजपचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनीसुद्धा नगराध्यक्ष यांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शविला. मात्र आता आमदारांनीच या निर्णयाला विरोध दर्शवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

काय आहे हे नेमके प्रकरण?
यवतमाळ येथील माँ अन्नपूर्णा बहुउद्देशीय प्रसारक मंडळ या संस्थेने वणी येथे अनाथ आश्रम बांधकामासाठी नगरपरिषदच्या मालकीची जागा उपलब्ध करून देण्यासंबंधी दि. 3 नोव्हे. 2021 रोजी अर्ज केला होता. तसेच केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन वणी यांनी केमिस्ट भवन बांधकामासाठी नगरपरिषदच्या मालकीची जागा देण्याची मागणी नगर पालिकेकडे केली होती.

दि. 20 डिसेंबर 2021 रोजी आयोजित वणी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत वरील दोन्ही अर्जाच्या अनुषंगाने ठराव मांडण्यात आला. ठराव क्र. 3 मध्ये केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन वणी याना जागा उपलब्ध करून देणे तसेच ठराव क्र. 4 मध्ये माँ अन्नपूर्णा बहुउद्देशीय प्रसारक मंडळ, यवतमाळ यांना नगरपरिषद मालकीची 20 हजार स्के.फूट जागा देण्याचे ठराव सत्तापक्षतर्फे मांडण्यात आला. त्यावेळी सभेत उपस्थित अपक्ष नगरसेवक पी.के. टोंगेसह भाजपचे नगर परिषद उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, नगरसेवक राकेश बुग्गेवार, नगरसेवक आरती वांढरे यांनीही ठरावाला कडाडून विरोध केला.

ठराव क्र. 3 आणि 4 वर टिप्पणी देताना नगर परिषद मुख्याधिकारी अभिजित वायकोश यांनी माँ अन्नपूर्णा बहुउद्देशीय प्रसारक मंडळ, यवतमाळ व केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन वणी यांनी आपल्या अर्जामध्ये निश्चित कोणती जागा मागितली याचा उल्लेख नाही. त्यामुळे या ठरावाला प्रशासकीय दृष्ट्या कायदेशीररित्या मत देता येणार नाही असे नमूद केले होते.

कोट्यवधींची जमीन संस्थेच्या घशात जाऊ देणार नाही- आ. संजीवरेड्डी बोदकुरवार
यवतमाळ येथील सदर संस्थेचे कोणतेही उल्लेखनीय कार्य नसताना नगरपरिषद मालकीची कोट्यवधींची जागा बळकविण्याचा घाट घातला जात आहे. केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन स्वतः जागा विकत घेऊन केमिस्ट भवन बांधण्यास सक्षम आहे. त्यामुळे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोट्यवधींची सरकारी जमीन कोणतीही संस्थेच्या घशात जाऊ देणार नाही

——————————————-

असा गुन्हा मी वारंवार करणार – तारेंद्र बोर्डे
नगर परिषदेच्या मालकीची अनेक वर्षांपासून पडीक असलेली जागा अनाथालयसाठी उपलब्ध करून देणे जर गुन्हा असेल, तर असा गुन्हा मी वारंवार करणार. शहरात एक चांगले आणि पुण्याचे काम होत असताना लोकप्रतिनिधी आडकाठीचे धोरण अवलंबत आहे. अनाथालयाला जागा देण्यासाठी आम्ही कोणत्याही विरोधाला तोंड देण्यास तयार आहो.

ठरावाबाबत सत्ताधारी नगर सेवकही अनभिज्ञ ?
दि. 20 डिसेंबरच्या सर्वसाधारण सभेत मंजूर ठरावावर सत्ताधारी भाजपच्या 19 नगरसेवकांनी सही केल्याचे समजते. आश्चर्याची बाब म्हणजे ठरावावर सह्या करणारे काही नगरसेवक सभा समाप्तीच्या वेळेवर सदनामध्ये पोहचले. त्यामुळे त्यांना ठरावाच्या विषयाबाबत काहीही माहिती नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

आमदार बोदकुरवार आणि नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे या दोघांमध्ये मागील काही काळापासून अंतर्गत धुसफुस सुरू आहे. मात्र ठराव प्रकरणावरून वणी भाजपमध्ये आमदार विरुद्ध नगराध्यक्ष असे उघडपणे दोन गट पडल्याचे दिसत आहे. येत्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात नगरपरिषद निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावरच अशा वादाला तोंड फुटल्याने वणीतील राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

हे देखील वाचा:

83: भारताच्या वर्ल्डकप विजयाचा रोमांचकारी प्रवास

डॉक्टर तुम्हीसुद्धा…! एका डॉक्टरची दुस-या डॉक्टरला मारहाण

प्रेयसीनेच भाटव्याच्या मदतीने केला प्रियकराचा खून

Comments are closed.