सुशील ओझा, झरी: बाजार करण्यासाठी मुकुटबन येथे आलेल्या एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने पळवून नेले. सोमवारी दिनांक 19 जुलै रोजी ही घटना घडली. या प्रकरणी मुलीच्या काकाने तक्रार दाखल केली होती. त्यावरून आरोपीला अल्पवयीन मुलीसह बोरी (पाटण) गावातून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी विरोधात पोस्को, ऍट्रोसिटीसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पीडित मुलगी (17) हिच्या आईवडिलांचे काही वर्षांआधी निधन झाले. त्यामुळे ती तिच्या काकासह तालुक्यातील एका गावात राहते. सोमवारी दिनांक 19 जुलै रोजी अल्पवयीन मुलगी ही तिच्या वहिनीसोबत बाजार करण्यासाठी तिच्या गावाहून मुकुटबन येथे गेली होती. बाजार केल्यावर त्या दोघीही गावाला परत जाण्यासाठी एका ऑटोत बसल्या.
मुलीने तिच्या वहिनीला दोन मिनिटात येते असे सांगितले व ती ऑटोतून खाली उतरली. मात्र बराच वेळ झाला तरी मुलगी काही परत आली नाही. त्यामुळे मुलीच्या वहिनीने परिसरात शोधाशोध केली. मात्र ती आढळून आली नाही. अखेर मुलीची वहिनी एकटीच गावी परत आली.
दुस-या दिवशी मुलीच्या काकांनी नातेवाईकांकडे शोधाशोध केली. मात्र ती आढळून आली नाही. त्यांनी अधिक माहिती काढली असता त्यांना पाटण येथील विकास विलास रासमवार (25) याच्याशी तिचे प्रेमसंबंध असल्याचे कळले. त्यांना लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेल्याचा संशय आला. त्यावरून त्यांनी मुकुटबन पोलीस स्टेशन गाठले व आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.
बोरी येथे सापडला आरोपी
तक्रार दाखल होताच मुकुटबन पोलिसांनी सूत्रे हलवण्यास सुरूवात केली. त्यांना माहिती मिळाली आरोपी हा अल्पवयीन मुलीसह बोरी येथे त्याच्या राहत्या घरी आहेत. त्यावरून बुधवारी दुपारी उशिरा सुमारास पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड, जितेश पानघाटे, मोहन कुडमेथे, रंजना सोयाम व चालक पुरुषोत्तम घोडाम हे तिथे गेले असता त्यांना ते दोघेही घरी आढळून आले. पोलिसांनी सं. 6 वाजताच्या दरम्यान मुलीला ताब्यात घेतले व आरोपीला अटक केली. सध्या आरोपीची यवतमाळ येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
आरोपी विकास विलास रासमवार (25) विरोधात भादंविच्या कलम 376 (2) (N) 363, 366(A) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा (ऍट्रोसिटी) अंतर्गत कलम 3(A) (W) (i), 3(1) (W) (2i), 3 (2) (VA) व बाललैंगिक संरक्षण कायदा (पोस्को) अंतर्गत कलम 4 व 8 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांच्या मार्गदर्शनात विजय वानखेडे, संतोष कायपेल्लीवार, परेश मानकर प्रकरणाचा तपास करीत आहे.
हे देखील वाचा:
वणी तालुक्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस, नदीनाले ओव्हरफ्लो