कधी होणार सेतू सुविधा केंद्र? सर्वसामान्यांचे, विद्यार्थ्यांचे हाल
सेतू केंद्र सुरु करण्यासाठी मनसेचे एसडीओंना साकडे
बहुगुणी डेस्क, वणी: वणी तहसील कार्यालयाच्या लगत असलेले सेतू सुविधा केंद्रात ठराविक दरापेक्षा जास्त रक्कम घेतल्याच्या कारणांवरून जिल्हाधिकाऱ्यांनी काही महिन्यापूर्वी हा सेतू बंद केला होता. यामुळे नागरिकांना विविध दाखले (उदा. रहिवासी, उत्पन्न, जातीचे दाखले) मिळवण्यासाठी आणि इतर शासकीय कामांसाठी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हे सेतू सुविधा केंद्र तात्काळ सुरु करावे अशी मागणी मनसे तर्फे करण्यात आली आहे. याबाबत एसडीओंना निवेदन देण्यात आले आहे.
सद्यस्थितीत खरीप हंगाम सुरू झाला असून यादरम्यान शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभासाठी अर्ज, कर्जांचा लाभ यास अन्य कामासाठी काही शासकीय दाखल्यांची गरज भासते. याचबरोबर शैक्षणिक कामासाठी विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला, चरित्र प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर इत्यादी दस्तऐवजांची आवश्यकता असते. मात्र येथील सेतू सुविधा केंद्र गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्या कारणाने दूरवर असलेल्या इतर खाजगी सेतू मध्ये ही कामे करावी लागत आहे.
याचाच फायदा घेत खाजगी सेतू सुविधा केंद्र चालक ठराविक दरापेक्षा जास्त दर आकारून ही कामे करून देतात परिणामी याचा सर्वसामान्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेऊन उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तांत्रिक बाबी दूर करत हा सेतू लवकरात लवकर चालू करावा अशी मागणी केली.

यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहराध्यक्ष अंकुश बोढे, शंकर पिंपळकर, अमोल मसेवार, विजय चोखारे, आकाश काकडे, विलन बोदाडकर, सूरज काकडे, धीरज बगवा, लक्ष्मण गाताडे, योगेश माथनकर, कृष्णा कुकडेजा, योगेश कदम यांच्या सह अन्य मनसैनिक उपस्थित होते..



Comments are closed.