मोबाईल बघता बघता दुचाकी लंपास… तालुक्यात 3 ठिकाणी दुचाकी चोरी

सावधान... तालुक्यात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यात दुचाकी चोरांचा सध्या धुमाकूळ सुरु आहे. वणी तालुक्यात अलिकडेच 3 ठिकाणी दुचाकी चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. यातील एक घटना वणी जवळील भालर रोड वरील एका फॅक्टरीसमोर, दुसरी घटना वेळाबाई जवळ तर तिसरी घटना ही घोन्शा जवळ घडली. अनेक लोक मजुरी किंवा शेतीसाठी दुचाकीचा वापर करतात. दुचाकी चोरटे काही केल्या पोलिसांच्या हाती लागत नसल्याने सातत्याने अशा घटना घडताना दिसत आहे.

पहिली घटना ही भालर रोडवरील रॉकवेल मिनरल्स या कंपनीसमोर घडली. स्वप्नील अशोक टेकाम (27) हा रॉकवेल कंपनीत इलेक्ट्रीशिअन म्हणून काम करतो. तो कंपनीत नेहमी त्याच्या स्प्लेंडर (MH 29BW6382 किंमत 40 हजार) या दुचाकीने जातो. दिनांक 28 मे रोजी त्याची नाईट शिफ्ट असल्याने तो रात्री ड्युटीसाठी त्याच्या दुचाकीने निघाला. रात्री 10 वाजता कंपनी समोरील पार्किंगच्या जागेत त्याने दुचाकी लावली व तो कामाला गेला. सकाळी 6 वाजता शिफ्ट संपल्यानंतर तो पार्किंगमध्ये परत आला. मात्र तिथे त्याला त्याची दुचाकी आढळली नाही. त्याने सेक्युरिटी गार्ड व इतरांना विचारणा केली. मात्र दुचाकी आढळली नाही. दुचाकीचा ठिकठिकाणी शोध घेतल्यानंतरही दुचाकी मिळाली नसल्याने अखेर त्याने वणी पोलीस स्टेशन गाठले व याबाबत तक्रार दिली.

दुसरी घटना ही शिरपूर-कोरपना रोडवरील आहे. संजय कवडू गोखरे (55) हे वणीतील जैन ले आऊट येथील रहिवासी असून त्यांची वेळाबाई येथे शेती आहे. 1 जून रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे त्यांची दुचाकी हिरो होन्डा स्प्लेंडर (MH29BK6774 किंमत 35 हजार) या दुचाकीने त्यांच्या मुलासह शेती पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांनी शिरपूर-कोरपना हायवेवर वेळाबाई शिवाराजवळ त्यांची दुचाकी लावली. दु. 4 वाजताच्या सुमारास त्यांचा मुलगा दुचाकी ठेवलेल्या ठिकाणी परत आला. मात्र तिथून दुचाकी चोरीला गेल्याचे त्याला आढळले. विशेष म्हणजे घटनेच्या तीन दिवस आधीच याच रोडवर एक पंक्चर दुचाकी चोरट्याने पळवली होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मोबाईल बघता बघता दुचाकी लंपास
तिसरी घटना ही घोन्सा बस स्टँडवर घडली. प्रकाश गोहणे हे घोन्सा येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे बजाज पल्सर ही दुचाकी (MH29CH9359 किंमत 90 हजार ) आहे. गुरुवारी दिनांक 5 जून रोजी ते घोन्सा बस स्टँडवर गेले होते. दरम्यान त्यांना मोबाईलवर कॉल आला त्यामुळे त्यांनी दुचाकीची चाबी काढली व ते मोबाईल हाताळत बाजूला गेले. दरम्यान थोड्या वेळाने ते दुचाकीजवळ आले असता त्यांना तिथून दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आले.

दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट
एकाच आठवड्यात तालुक्यात 5 पेक्षा अधिक दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. 27 मे रोजी शिरपूर रोडवरच सावंगी गावाजवळ पंक्चर दुचाकी चोरट्यांनी लांबवली होती. तर दिनांक 2 मे रोजी वणीतील मंगलम पार्क येथून चोरट्याने शाईन ही दुचाकी चोरली. तर त्याआधी तिरुपती मंगल कार्यालयासमोरून चोरट्याने दुचाकी चोरली होती. अनेक लोक शेती किंवा इतर मजुरीच्या कामासाठी दुचाकीचा वापर करतात. मात्र सातत्याने दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने दुचाकी स्वारांमध्ये दहशत पसरली आहे.

यातील पहिली घटना वणी पोलीस स्टेशन, दुसरी घटना शिरपूर पोलीस स्टेशन तर तिसरी घटना मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे. तिन्ही घटनेत पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 303 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहे.

Comments are closed.