उड्डाणपुलाच्या खांबावर चढून मनसेचे ‘अभिनव’ आंदोलन

काही काळ वाहतूक ठप्प, सर्विस रोडसाठी रेल्वे उड्डानपुलाजवळ आंदोलन

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहराला नागपूर आणि यवतमाळला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आक्रमक आंदोलन केले. चिखलगाव रेल्वे गेट येथील निर्माणाधीन पुलाच्या 30 फूट उंचीच्या खांबावर चढून मनसैनिकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला, ज्यामुळे शहरात तब्बल तीन तास वाहतूक पूर्णपणे थांबली. दरम्यान झालेल्या चर्चेत येत्या दोन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले. त्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले. मात्र, आश्वासनांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष अंकुश बोढे यांनी दिला आहे.

चिखलगाव रेल्वे गेट आणि संविधान चौकातील उड्डाणपुलांच्या कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून, पर्यायी रस्त्यांची (सर्व्हिस रोड) व्यवस्था नसल्याने वाहतूक कोंडी, चिखल, धूळ आणि अपघातांचा धोका वाढला आहे. मनसेने यापूर्वी प्रशासनाकडे ही समस्या सोडवण्याची मागणी केली होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्याने संतप्त मनसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

सकाळी मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार आणि शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मनसैनिकांनी मुकुटबन रस्ता आणि यवतमाळ रस्ता अडवला. काही कार्यकर्त्यांनी पुलाच्या खांबावर चढून घोषणाबाजी केली. पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी आंदोलकांना खाली उतरवून ताब्यात घेतले, ज्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल होत असताना, पोलिसांनी मनसे नेते राजू उंबरकर यांच्याशी चर्चा केली. बांधकाम कंपनीच्या व्यवस्थापकांनी लवकरात लवकर समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्याने ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडण्यात आले आणि आंदोलन तात्पुरते स्थगित झाले.

पोलिस स्टेशनमध्ये झालेल्या बैठकीत पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, मनसे नेते राजू उंबरकर, रेल्वे निरीक्षक बलवीर सिंह, सहाय्यक उपनिरीक्षक सचिन नागपुरे, जुगलकिशोर दिवाण आणि कंपनीचे अभियंता हर्षित कुमार यांच्यात चर्चा झाली. यात येत्या दोन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, आश्वासनांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेने दिला आहे.

या आंदोलनात मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहराध्यक्ष अंकुश बोढे, रुपेश ढोके, विलन बोदाडकर, परशुराम खंडाळकर, महेश हातगावकर, विठ्ठल बोथाडे, शंकर पिंपळकर, मयुर घाटोळे, धीरज पिदूरकर, प्रविण कळसकर, कैलास निखाडे, प्रदीप बदखल, गुड्डू वैद्य यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. आता प्रशासनाची पुढील कारवाई आणि नागरिकांच्या प्रतिक्रियांकडे लक्ष लागले आहे.

Comments are closed.