मारेगाव येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

भास्कर राऊत, मारेगाव : खासगी शिकवणी वर्ग आटोपून सायकलने गावाकडे जात असलेल्या अल्पवयीन शाळकरी मुलीचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना गुरुवारी 16 जून रोजी घडली. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी हर्षल धंदरे (23) रा. मांगरुळ ता. मारेगाव याला अटक केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्राप्त माहितीनुसार पीडित मुलगी तालुक्यातील एका गावात राहत असून नेहमीप्रमाणे खासगी शिकवणी वर्गासाठी मारेगाव येथे आली होती.
वर्ग आटोपून मैत्रिणीसोबत सायकलने गावाकडे परत जात होती. दरम्यान मागून दुचाकीवर आलेल्या आरोपीने आयटीआय जवळ वाईट उद्देशाने तिचा हात पकडून मला तुझ्याशी बोलायचे आहे तुझा मोबाईल नंबर दे, अशी मागणी केली. भररस्त्यावर अचानक घडलेल्या या वाईट प्रसंगामुळे मुलगी घाबरून गेली.

घरी गेल्यावर मुलींनी आपल्या कुटुंबियांना आपबीती सांगितली. त्यावरून कुटुंबीयांनी मुलीला सोबत घेऊन मारेगाव पोलीस ठाण्यात येऊन आरोपीविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली.. पोलिसांनी आरोपी हर्षल धंदरे (23) रा. मांगरुळ ता. मारेगाव याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पी. एस. आय. राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात ए. एस. आय. सावंत करीत आहेत.

Comments are closed.