जितेंद्र कोठारी, वणी: राज्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक उपाय योजना तसेच अग्निविरोधी यंत्रणा बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र वणी येथील बहुतांश दवाखान्यांमध्ये आगीपासून बचाव करण्याची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आश्चर्य म्हणजे अशी कोणतीही यंत्रणा नसतानाही काही दवाखान्यात तर क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांना दाखल करण्यात आल्याचे ‘वणी बहुगुणी’च्या निदर्शनास आले आहे.
वणी नगर परिषद हद्दीत ग्रामीण रुग्णालय, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसह तब्बल 40 ते 50 इतर दवाखाने आहे. या दवाखान्यांमध्ये विविध आजारावर उपचारासाठी ओपीडीसह रुग्णाना दाखल करण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सध्या व्हायरल फिवर व डेंगू या आजाराची साथ पसरली आहे. त्यामुळे लहान मुलांचे व इतरही दवाखाने हाऊसफुल्ल आहे.
वणी येथील नांदेपेरा रोड, बस स्थानक परिसर, विराणी टॉकीज रोड, गांधी चौक, महाराष्ट्र बँक चौक, जत्रा रोड, टुटी कमान या भागात अनेक खासगी डॉक्टरांचे दवाखाने आहे. यात बहुतांश दवाखाने रहिवाशी इमारतीमध्ये थाटण्यात आले आहे. काही दवाखाने एकाच हॉलमध्ये प्लायवूडचे पार्टिशन टाकून सुरु करण्यात आले आहे. अग्निशामक यंत्रणेसह आपत्कालीन निकास दार, खिडक्या, व्हेंटिलेशनचा अभावही या दवाखान्यांमध्ये आहे. रहिवाशी इमारतीमध्ये सुरु असलेल्या या हॉस्पिटलमध्ये अग्निरोधी कोणतीही यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. तसेच परिस्थिती उद्धभवल्यास रुग्णांना व नातेवाईकांना बाहेर पडण्यासाठी आपातकालीन दारसुद्दा या हॉस्पिटलमध्ये नाही.
विशेष म्हणजे यातील निम्याहून अधिक दवाखान्याची नगर परिषद आरोग्य विभागाकडे नोंदणी करण्यात आलेली नाही. रुग्णांना उपचारासाठी दाखल करणाऱ्या सर्व दवाखान्याना महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षण अधिनियम 2006 या कायद्यानुसार अग्निरोधी यंत्रणा बसविणे तसेच इतर नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. तसेच शासनाने ठरवून दिलेल्या खासगी संस्थेकडून वर्षात एकदा फायर ऑडिट करून नगरपरिषद कडून सर्टिफिकेट घेणे गरजेचे आहे. तसे न केल्यास नगर परिषद अग्निशमन अधिकारी यांना दवाखान्याची तपासणी करून सील लावण्याचे अधिकार आहे.
वणी येथील अनेक खासगी चिकित्सक तपासणी फी व औषधीवरील कमीशनच्या मार्गाने भरमसाठ कमाई करीत आहे. मात्र रुग्णांची सुरक्षा व सुविधेबाबत त्यांच्याकडून दुर्लक्षित धोरण अवलंबविले जात आहे. रुग्णांची तपासणी पासून तर उपचार प्रक्रियेत विजेवर आधारित उपकरणांचे वापर डॉक्टरांकडून केल्या जाते. नगर परिषद आरोग्य विभाग व खासगी दवाखाना संचालकांनी या बाबींकडे लक्ष न दिल्यास काही दुर्घटना घडल्यास मोठे नुकसान होऊ शकते.
हे देखील वाचा:
Comments are closed.