जितेंद्र कोठारी, वणी: वणी तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. त्यात आता म्युकर मायकोसिस (ब्लॅक फंगस) या जीवघेणा आजाराचे तालुक्यात शिरकाव झाल्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. तालुक्यातील बोपापुर येथील 65 वर्षीय व्यक्तीमध्ये म्युकर मयकोसिसचे लक्षण आढळले आहे. सदर व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. मात्र वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारानंतर ते कोरोना पासून मुक्त झाले होते. दरम्यान त्या व्यक्तीला आज दुपारी यवतमाळहून सुटी मिळाल्याची माहिती आहे.
बोपापूर येथील एका व्यक्तीला म्युकर मायकोसिसचे लक्षणं आढळून आले होते. त्यामुळे त्यांनी वणी ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली. तपासणीनंतर खबरदारी म्हणून त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यात या आजाराचे एकूण 3 रुग्ण आढळले आहे. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर बोपापूर येथील रुग्णासह 2 रुग्णांचे उपचार यवतमाळ येथे सुरु आहे. दरम्यान बोपापूर येथील व्यक्तीची प्रकृती सध्या ठिक असून त्यांना आज दुपारी दवाखान्यातून सुटी देण्यात आल्याची माहिती त्यांच्या परिचितांनी दिली.
कोरोना रुग्णांना कोरोनातून बाहेर आल्यानंतर म्युकर मायकॉसिस या बुरशीजन्य रोगाचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. या आजाराचे रुग्ण वाढलेले दिसून येत आहे. त्यामुळे या आजारापासून रुग्णांचा बचाव करण्यासाठी उपाय योजना सुचवल्या जात आहेत. एका बुरशीमुळे होणाऱ्या संसर्गामुळे अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे.
बुरशीमुळे होणाऱ्या या आजाराला ‘म्यूकर मायकोसिस’ म्हणतात. म्यूकर मायकोसिसवर योग्यवेळी उपचार झाले नाहीत, तर संसर्ग शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचू शकतो. म्यूकर मायकोसिसग्रस्त रुग्णांवर जबडा, डोळा, दात यांची शस्त्रक्रिया करावी लागते. ज्या रुग्णांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, त्यांना या बुरशीची लागण होत नाही. मात्र, अनियंत्रित मधुमेह, कर्करोग, एडस् असणाऱ्यांना, तसेच स्टेरॉयड व सायक्लोस्पोरिन ही प्रतिकारशक्ती कमी करण्यास कारणीभूत ठरणारी औषधे घेणाऱ्यांना हा आजार पटकन लक्ष्य बनवतो.
बरे झालेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी: डॉ विकास कांबळे
म्युकर मायकोसिस हा एक बुरशीजन्य आजार आहे. कोरोना आजारापासून मुक्त झालेल्या रूग्णांना तसेच उच्च मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना म्युकर मायकोसिस आजार होण्याची शक्यता जास्त असते. नागरिकांनी नेहमी स्वच्छ व कोरडा मास्क घालावा, हात वारंवार धुवावे, स्वच्छता ठेवावी जेणेकरून या आजाराची लागण होणार नाही. डोळ्याच्या आजूबाजूला किंवा जबड्यात सूज व लालसर दिसल्यास तात्काळ योग्य डॉक्टर कडेजाऊन निदान करावे.
:डॉ. विकास कांबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी वणी
हे देखील वाचा:
प्रियकराच्या प्रेमाला आला चांगलाच बहर, प्रेयसी गर्भवती होताच केले हात वर