बहुगुणी डेस्क, वणी: वणी-घुग्घुस रोडवरील एका बारसमोर मंदर शिवारात एका इसमाचा 18 ऑगस्ट रोजी सकाळी नग्नावस्थेत मृतदेह आढळला होता. मृतदेहाच्या शरीरावर दगडाने ठेचल्याच्या जखमा होत्या. खून असल्याच्या प्राथमिक अंदाजावरून मृतक देवराव गुंजेकर (वय 55) याच्या भाचीने याबाबत तक्रार दिली होती. अखेर या प्रकणाचा छडा लागला असून आरोपी आशिष संजय कटोते (वय 25 रा. वागदरा) याने हा खून केल्याचे समोर आले आहे. मंगळवारी संध्याकाळी नांदेपेरा रोडहून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. अटकेनंतर खुनाचे कारण देखील स्पष्ट झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
प्राप्त माहितीनुसार, मृत देवराव हे रजानगर लालगुडा (नवीन) येथील रहिवासी होते. दोन महिन्यांपूर्वीच ते येथे राहण्यास आले होते. ते तिथे त्यांच्या भाचीसह राहत होते. ते भंगार गोळा करण्याचे काम करायचे. मृत्यूच्या दोन दिवसांआधी ते बेपत्ता झाले होते. देवरावला दारु पिण्याची सवय होती. त्यामुळे तो अनेकदा एक दोन दिवस घरून बेपत्ता राहत होते. त्यामुळे त्याच्या भाचीने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली नव्हती. मात्र तिस-या दिवशी घुग्घुस रोडवर त्यांचा मृतदेह आढळून आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी खबरीचे जाळे ऍक्टिव्ह केले. तांत्रिक तपासाची मदत घेतली. दरम्यान त्यांना घटनेच्या आदल्या रात्री लालगुडा चौपाटीवरील एका सीसीटीव्हीत देवराव हे एका तरुणासोबत दुचाकीने जात असल्याचे शेवटचे आढळून आले होते. मात्र सीसीटीव्हीतून सोबत असलेल्या व्यक्तीची ओळख पटत नव्हती. अखेर त्या व्यक्तीसोबत असलेल्या दुचाकीच्या नंबरवरून पोलिसांनी दुचाकी मालकाची ओळख पटवली. मात्र दुचाकी मालकाने ही दुचाकी घटनेच्या दिवशी त्याचा मित्र आशिष याला दिल्याचे सांगितले.
आरोपी व मृतकात वाद
खबरींकडून पोलिसांना खुनाच्या दोन दिवस आधी आरोपी आशिष व मृत देवराव यांच्यात वाद झाल्याची माहिती मिळाली. आशिष हा लालगुडा चौपाटीजवळ झोपून असताना आशिषचा मोबाईल व पैसे गहाळ झाले होते. सदर मोबाइल व पैसे देवरावने चोरल्याची माहिती आशिषला मिळाली. त्यावरून दुस-या दिवशी आशिष हा देवरावला भेटायला गेला. त्याने देवरावला दारु पाजण्याचे आमिष दाखवून दुचाकीवर बसवले. तो देवरावला घुग्घुस रोडवरील मंदर जवळील निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तिथे त्यांने मोबाईल व पैसे का घेतले याचा जाब विचारला. यातून वाद वाढला व हाणामारीपर्यंत पोहोचला. रागाच्या भरात आशिषने जवळचा दगड उचलून देवराववर प्रहार करीत त्याची हत्या केली. दरम्यान लालगुडा चौपाटी येथील एका सीसीटीव्हीत ते दोघेही दुचाकीने जात असताना कैद झाले होते. हाच या प्रकरणातला मोठा क्ल्यू ठरला.
दारूच्या मोहानेच घेतला जीव
देवराव याला दारू पिण्याची सवय होती. तो भाड्याने राहत होता. मात्र त्याच्या दारू पिण्याचा त्रास घरमालकाला व्हायचा. त्यामुळे तो सारखा खोली बदलवत राहायचा. दोन महिन्यापूर्वी तो वागदरा येथे राहत होता. गावात राहत असल्याने त्याची आरोपी आशिष सोबत ओळख होती. आशिषला देवरावच्या दारू पिण्याच्या व्यसनाची माहिती होते. त्यामुळे त्याने दारु पाजण्याचे आमिष दाखवतच देवरावचा काटा काढण्याचे ठरवले व त्यातच देवरावची हत्या झाली. या खुनाचे कारण केवळ दोघांमध्ये झालेला क्षुल्लक वाद आहे की आणखी दुसरे काही कारण आहे, याचा तपास पोलीस करीत आहे. एका मद्यपी भंगार वेचणा-याच्या खुनाकडे कुणी विशेष लक्ष देणार नाही, असे वाटून आरोपी जसे काही झालेच नाही या अविर्भावात गावात फिरत होता. मात्र अवघ्या एक आठवड्यातच खुनाचा छडा लागला गेला. यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन होत आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, एसडीपीओ सुरेश दळवे, स्थानिक गुन्हे शाखा पो.नि. सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात एपीआय दत्ता पेंडकर, पीएसआय धनराज हाके, पोना सुधीर पांडे, सुनील खंडागळे, सुधीर पिदूरकर, नीलेश निमकर, सलमान शेख, नरेश राऊत यांनी केली.



Comments are closed.