वनोजादेवीजवळ आढळला तरुणाचा मृतदेह

बहिणीच्या लग्नासाठी आला होता गावी, प्रेम प्रकरणातून हत्या?

0 2,359

ज्योतिबा पोटे, मारेगाव: गुरुवारी सकाळी वनोजादेवीजवळ गोरज फाट्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह फेकण्यात आला आहे. हा तरुण औरंगाबादहून त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी गावी आला असताना ही घटना घडली.

शुभम अनिल झाडे (19) हा वनोजा येथील रहिवाशी आहे. तो औरंगाबाद इथे खासगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती आहे. 14 मेला त्याच्या मावस बहिणीचे लग्न असल्याने तो लग्नासाठी आधीच वनोजादेवी इथं त्याच्या गावी आला होता. लग्नकार्य संपल्यानंतर तो बेपत्ता होता. अखेर गुरुवारी सकाळी वनोजापासून 2 किलोमीटर अंतरावर गोरजफाटा इथं त्याचे प्रेत आढळून आले.

प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून ?

खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ही हत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याचा कयास लावला जात आहे. शिवाय मारेकरी एक नसून अनेक असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

मृताच्या शरीरावर चाकुच्या जखमा आढळून आल्या आहेत. हत्येनंतर मारेक-यांनी गळ्याभोवती दोरी आवळून हा आत्महत्येचा प्रकार भासवण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे शुभमची सामुहिकरित्या हत्या करण्यात आल्याचाही अंदाज बांधला जातोय. घटनास्थळाचा पंचनामा उपनिरीक्षक नितीन बलिगवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींवर 302 कलम नुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर करीत आहे. एक लग्नासाठी बाहेरगावाहून आलेल्या तरुणाची अशी निर्घृण हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणी विविध चर्चेला देखील उधाण आलं आहे.

Comments
Loading...