अवैधरीत्या मुरूम वाहतूक करणाऱ्या 3 ट्रक्सवर कार्यवाही

ट्रकसह १५ ब्रास रेती जप्त, पोलीस स्टेशनला ट्रक जमा

0

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथून दोन किमी अंतरावर असलेल्या रुईकोट येथे अवैधरीत्या मुरूम वाहतूक करणारे तीन ट्रक्स तहसीलदार यांनी पकडलेत. ते नंतर पोलीस स्टेशनला लावण्यात आले आहे. त्यातून १५ ब्रास रेती जप्त करण्यात आली.

तहसीलदार गिरीश जोशी व नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांना रुईकोट बसस्टँड परिसरात तीन ट्रकमध्ये मुरूम भरून दिसलेत. ट्रकची तपासणी केली असता अवैधरीत्या ट्रकमध्ये मुरूम भरून वाहतूक करीत असल्याचे आढळले. यावरून पंचनामा करून तिन्ही ट्रक मुकुटबन पोलीस स्टेशनला लावण्यात आलेत. जप्त केलेल्या प्रत्येक ट्रक मध्ये ५ ब्रास असे एकूण १५ ब्रास मुरूम पकडण्यात आले.

मुकुटबन ते बोरी (पाटण ) या मुख्य मार्गाचे रुंदिकरणाचे काम सुरू आहे. या कामाकरिता खडकी येथील ओम साई ट्रान्सपोर्ट यांच्या खनीजपट्ट्यातून मुरूम भरून वाहतूक केली जात आहे. तहसीलदार यांनी ट्रक क्रमांक ( Mh 34 AB 3648, MH 34 AB 1054, MH 29 M 0747) जप्त केलेत. त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करणार असल्याचे तहसीलदार जोशी यांनी सांगितले आहे. रस्ते, वॉलकंपाउंड व घर बांधकामाकरिता तेलंगणातील अनंतपूर येथून खुलेआम ट्रक व ट्रॅक्टरने रेतीची तस्करी सुरू असल्याचं बोललं जातं.

रॉयल्टीच्या नावाखाली दिवसभर वाहतूक सुरू आहे. महाराष्ट्रात रेतीघाट हर्रास झाले नसताना तेलंगणातील रेती आणण्याचा अधिकार आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी मुख्य मार्ग व अंतर्गत मार्गांचे काम सुरू आहे. यातील बहुतांश कामावर वनविभाग व महसूल विभागाच्या हद्दीतून अवैधरीत्या मुरूम व रेती चोरी केल्या जात आहे. याकडेसुद्धा महसूल व वनविभागाने लक्ष देऊन कार्यवाही करावी अशीही मागणी होत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.