जब्बार चीनी, वणी: भविष्यात आयएएस ऑफिसर होऊन समाजाचे प्रतिनिधित्व करायचे आहे अशी इच्छा 10 वी मध्ये वणी उपविभागात प्रथम आलेल्या रजियाने व्यक्त केली. शिक्षण प्रसारक मंडळ (SPM) शाळेची विद्यार्थीनी असेलेल्या कु. रजिया मन्सूर शेख हि 10 वीच्या परीक्षेत 97.60 टक्के गुण प्राप्त करत केवळ तालुक्यातच नाही तर वणी उपविभागात अव्वल आली आहे. प्रतिकुल परिस्थितीवर मात करत रजियाने मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या या यशाबाबत भारतीय मुस्लिम परिषद तर्फे तिचा सत्कार करून तिला गौरविण्यात आले.
गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता भारतीय मुस्लिम परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रजियाच्या घरी जाऊन तिला भेटवस्तू व पुष्पगुच्छ देत सत्कार केला. वणीच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लिम समाजाच्या कुण्या मुलीने प्रथम येण्याच मान मिळवल्याने ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. मुस्लिम समाज अद्यापही समाजात मागास असून रजियासारख्या मुलीने केवळ समाजातील मुलींसमोरच नाही तर संपूर्ण समाजापुढे आदर्श ठेवला आहे, असे मत यावेळी भारतीय मुस्लिम परीषद तर्फे व्यक्त करण्यात आले.
रजिया ही शास्त्री नगर इथे राहते. ती मनसून शेख यांची मुलगी आहे. तिचे आजोबा सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे. त्यामुळे शिक्षकांसोबतच रजियाला तिच्या आजोबांचेही वेळोवेळी मार्गदर्शन मिळत होते. भविष्यात रजियाला आयएएस अधिकारी बनायचे असल्याची मनिषा तिने बोलून दाखवली. यावेळी भारतीय मुस्लीम परिषदेचे नईम अजीज, आसीफ शेख, रफीक रंगरेज, सलीम खान, सईद खान, इसमाने खान पठान, सै मुझमिल, जमु खान, अमान भाई, ईसराइल खान, व ईतर मुस्लिम परिषदचे उपस्थित होते.