नाफेडच्या डब्ब्यात शेतकऱ्यांचा माल, पण चुकारे कधी मिळणार ?
ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथे शासकिय तुर खरेदी नाफेडद्वारा होत असुन, गेल्या ८ फेब्रुवारीला तुर खरेदीचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात आमदाराच्या उपस्थितित झाला. मात्र खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे अजून पर्यंत न मिळाल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.
या वर्षी तालुक्यातील शेतकरी विषबाधा, गुलाबी बोंड अळी, अत्यल्प पाऊसाने मेटाकुटीस आला होता. त्यातच तुरीचे उत्पन्न कमी झाले आणि भावही अत्यल्प मिळाला. आधीच हवालदिल झालेल्या शेतक-यांना किमान तुरीचा चुकारा तरी वेळेवर मिळेल अशी आशा होती. मात्र शेतक-यांना अद्यापही तुरीचा चुकारा मिळाला नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीक आला आहे. येथील लोकप्रतिनिधी चुकारे मिळवून देन्यास असमर्थ ठरत आहे. तुर खरेदीसाठी शेतकऱ्यांना आपले खाते ऑनलाईन करुन खात्यात तूर चुकारे तुर खरेदी पासून १५ दिवसात जमा करण्याचा आदेश आहे. मात्र अजुनपर्यंत तूर चुकारे न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
खरेदी विक्रीचे व्यवस्थापकाच्या माहिती नुसार खरेदी केलेली जेवढी तूर वेअर हाऊसमध्ये पाठविली जाते. तेवढे पेमेंट खरेदी विक्री खात्यात जमा होऊन शेतकर्यांना धनादेशामार्फत दिली जाते. मात्र चुका-याचा अद्याप पत्ता नाही. तूर खरेदी करताना तूर चाळणी लाऊन, तुरीतील ओलावा तपासून घेतली जाते. मात्र चुकारा करताना मात्र तितकी तत्परता दाखवली जात नाही. तुरीचे चुकारे ताबडतोब मिळण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. यावर्षी एकून ३३१२.५२ क्विंटल खरेदी झाली असुन वेअर हाऊस मध्ये १७६० क्विंटल तूर पाठविली गेली आहे. मात्र चुकारे अद्याप मिळालेले नाही. याकडे लोकप्रतिनिधी लक्ष का घालत नाही असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.