नगर पालिकेतर्फे 10 लाखांच्या कामांना मंजुरी
प्रगती नगरनंतर आता तीन प्रभागात कामांना होणार सुरुवात
बहुगुणी डेस्क, वणी: वणी नगरपालिकेतर्फे सर्वसाधारण आणि रस्ता तसेच आर्थिक दुर्बल घटक निधी अंतर्गत सुमारे 10 लाखांच्या पाईप ड्रेन कामाला मंजुरी मिळाली आहे. याबाबत निविदा मागवण्यात आल्या असून तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर एका महिन्यांच्या आत हे काम पूर्ण करण्यात येईल अशी माहिती नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी दिली.
पाईप ड्रेनचे काम हे प्रभाग क्रमांक 3, 9, 10, 12 इथे होणार असून यात गोडावून ते हमीद चौक, मोमीनपूरा जयस्वाल ते समाज मंदिर, बाविस्कर ते सुरतीकर, गुरुनगरमध्ये बदखल ते घाटे, जिलठे ते एनपोतवार, झाडे, जुगरी ते पोटे इत्यादी पर्यंतचे पाईप ड्रेनेजचे काम आहे. तर गुरुनगर प्रभाग क्रमांक तीन मध्ये बाजीराव पिंपळकर ते विराणी टॉकीज पर्यंत रस्ता दुरुस्तीचे काम आहे. तसेच शात्रीनगरमध्ये ट्युबवेल पॅनल बसवण्याचे कामही यात आहे.
‘वणी बहुगुणी’शी बोलताना नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे म्हणाले की….
गेल्या अनेक दिवसांमध्ये जुन्या नगरसेवकांच्या उदासिनतेमुळे अनेक भागांमध्ये विकास कामाला खोडा बसला होता. धुमेनगरच्या नागरिकांची अनेक दिवसांपासू पाईप ड्रेनच्या कामांची मागणी केली होती. तसेच इतर प्रभागातही ही समस्या होती. अखेर याबाबत निर्णय घेण्यात आला. याआधीच प्रगती नगर येथे पाईप ड्रेनच्या 26 लाखांच्या कामाला सुरूवात झाली आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता करून लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहिल.