गुरुवारी वणीकर धावणार नशामुक्तीचा संदेश घेऊन

नमो युवा रन अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धा, आकर्षक बक्षिसांचा वर्षाव

बहुगुणी डेस्क, वणी: नशामुक्तीचा संदेश घेऊन वणीकर धावणार आहेत. गुरुवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी नमो युवा रन या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 6.30 वाजता छ. शिवाजी महाराज चौक येथून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. महिलांचे दोन गट व पुरुषांचे दोन गट अशा चार गटात ही स्पर्धा होणार असून स्पर्धेत बक्षिसांची लयलूट करण्यात आली आहे. सेवा पंधरवाडा अंतर्गत वणी शहर भाजप तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपचे शहर अध्यक्ष ऍड. नीलेश चौधरी यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त सध्या ‘सेवा पंधरवाडा’ याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त देशभरात ‘नमो युवा रन’ हा राबवला जात आहे. या निमित्ताने नशा मुक्तीचा संदेश देण्यात येत आहे. वणीत देखील ही मॅराथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. गुरुवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी 6.30 वाजता छ. शिवाजी महाराज चौक (टिळक चौक) येथून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

आकर्षक बक्षिसांचा वर्षाव
16 वर्षाच्या आत व 16 वर्षांच्या वर अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. तसेच महिला व पुरुषांचे दोन विभाग आहेत. 16 वर्षाआतील गटात पहिल्या तीन क्रमांकाला 3 हजार, 2 हजार, 1 हजार व सन्मानचिन्ह बक्षिस देण्यात येणार आहे. तसेच 3 प्रोत्साहनपर बक्षिस देखील यात राहणार आहे. तर 16 वर्षांवरील गटात पहिल्या 3 क्रमांकाला 5 हजार, 3 हजार, 2 हजार, सन्मानचिन्ह तसेच 3 प्रोत्साहनपर बक्षिस देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत कोणतीही फिस नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तरुणाईची ऊर्जा देशसेवेकडे वळवणं उद्दिष्ट
नशेमुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे. तरुणांची शक्ती, ऊर्जा आणि दृढनिश्चय देशसेवेसाठी वापरला पाहिजे. नमो रन मॅरेथॉनमुळे आपली तरुणाई देशभक्तीला प्राधान्य देईल आणि आत्मनिर्भर भारताच्या ध्येयासाठी प्रेरित होईल. त्यामुळे अधिकाधिक वणीकरांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे.
– ऍड. नीलेश चौधरी, शहराध्यक्ष, भाजप

स्पर्धेसाठी नावनोंदणी स्पर्धेच्या वेळी करण्यात येईल. तसेच ही स्पर्धा केवळ वणी विधानसभा क्षेत्रासाठीच आहे. सर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश आसुटकर, नितीन वासेकर, बालाजी भेदोडकर, राहुल कुत्तरमारे, ऍड शुभम छाजेड, तुकाराम माथनकर, नितीन बिहारी, विकास पिदूरकर, प्रीती बिडकर, विनोद महाकुलकर यांना संपर्क साधता येणार आहे. सेवा पंधरवाडा संयोजक लक्ष्मण उरकुडे व सहसंयोजक स्मिता नांदेकर यांच्या मार्गदर्शनात स्पर्धेचे नियोजन केले जात असून भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी यासाठी परिश्रम घेत आहेत.

Comments are closed.