वंचितचा एल्गार: 25 ला मारेगावात आक्रोश मोर्चा

विविध मागण्यांसाठी राजू निमसटकर यांच्या नेतृत्वात मोर्चा

बहुगुणी डेस्क, वणी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विज्ञानवादी धम्माच्या वारशापुढे घेऊन वंचित, शोषित, आदिवासी, बहुजन समाजावरील अन्यायाविरोधात वंचित बहुजन आघाडी तालुका मारेगावच्या वतीने २५ सप्टेंबर रोज गुरुवारला मारेगावात कार्यकर्ता मेळावा आणि आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्ताने राजकारणापलीकडे जाऊन समाज संघटित करण्याची गरज अधोरेखित केली आहे.

सत्ताधारी मनुवादी व्यवस्थेमुळे समाज विखुरलेला असल्याचे सांगून वंचित बहुजन आघाडीने समाज एकत्र आणण्यासाठी आणि बलशाली पक्ष म्हणून उदयास येण्यासाठी कंबर कसली आहे. भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांसारख्या संघटनांना बळकट करून अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

बदकी भवन मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता होणाऱ्या मेळाव्यात नेते-कार्यकर्ते समाज स्थितीवर चिंतन करतील आणि बाबासाहेबांच्या ‘संघटित व्हा’ संदेशावर विचारमंथन करणार आहेत. हा कार्यक्रम समाजाला नवी दिशा देणारा महत्त्वाचा टप्पा ठरेल. मेळाव्यानंतर आक्रोश मोर्चा काढून मारेगाव तहसील कार्यालयास निवेदन देणार असून, याचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे आणि पदाधिकारी करतील.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रमुख मागण्या : बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या; शेतकऱ्यांचे सर्व कर्ज सरसकट माफ करा आणि सातबारा कोरा करा; अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करा आणि नुकसानग्रस्तांना मदत द्या.
प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी हाच बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी एकमेव पर्याय असल्याचे सांगून राजू निमसटकर यांनी सर्वांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Comments are closed.