‘जनता कन्फ्यूज’… अनलॉकच्या काळात ‘जनता कर्फ्यू’ची गरज?

5 दिवसांच्या जनता कर्फ्यूवर 'वणी बहुगुणी'चा संपादकीय लेख

0 3,803

‘जनता कंफ्यूज’… अनलॉकच्या काळात ‘जनता कर्फ्यू’ची गरज?
– निकेश जिलठे (संपादक, वणी बहुगुणी)

कोरोनाच्या काळात झालेल्या लॉकडाऊनने सर्वसामान्यांसह, मजूर, व्यापारी, व्यवसायीक, शेतकरी, लघू गृह उद्योग इ अशा सर्वांचीच वाट लावली आहे. बेरोजगारी, नुकसान हे सारंच या काळात लोकांनी सहन केलं. त्यानंतर मजूर कामासाठी आता कुठे घरा बाहेर पडला आहे. सलून चालकांना आता कुठे परवानगी मिळाली आहे. मात्र तशातच अचानक वणीकरांना मीडियाच्या माध्यमातून शहरात जनता कर्फ्यू लागल्याची माहिती मिळते. ज्यांच्या भरवश्यावर हा जनता कर्फ्यू यशस्वी करायचा आहे, मुळात त्या व्यावसायिकांसह, जनतेलाच या बाबत काहीही माहिती नव्हती.

जनता कर्फ्यू हवा की नाही याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. सोशल मीडियात याबाबत चांगलीच चर्चा रंगत आहे. कुणी याच्या समर्थनात आहे तर कुणी विरोधात. सर्वपक्षीय बैठकीत एकमताने जनता कर्फ्यू बाबत शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात आले. मात्र काही नेते म्हणजे संपूर्ण वणी असे गृहित धरणे योग्य का? वणीत विविध सामाजिक संघटना आहेत. व्यापारी तसेच वेगवेगळ्या व्यवसायाच्या वेगवेगळ्या संघटना आहेत. याशिवाय कामगार, हमाल, चालक, शेतकरी इ. यांच्याही विविध संघटना आहेत. त्यांना वणीकर म्हणून विचारात घेतले गेले का ? असाही प्रश्न जनता कर्फ्यूच्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

मोदींचा जनता कर्फ्यू आणि मिनी मोदींचा कर्फ्यू…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 25 मार्च रोजी देशभरात लॉकडाऊन लागणार असल्याची घोषणा केली होती. मात्र त्याआधी त्यांनी 23 मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ची घोषणा केली. हा जनता कर्फ्यू म्हणजे एक प्रकारे येणा-या लॉकडाऊनची लिटमस टेस्ट होती. येणार लॉकडाऊनसाठी नागरिकांनी मानसिकदृष्या किती तयार आहेत. शिवाय त्यांना मानसिकदृष्ट्या तयार करणे हा देखील या जनता कर्फ्यू मागचा उद्देश होता. त्यामुळे जनता कर्फ्यूची लिटमस टेस्ट झाल्यानंतरच लॉकडाऊन लावण्यात आले.

लॉकडाऊनने लोकांना बेरोजगार, कंगाल केले. त्यामुळे लॉकडाऊनबाबत लोकांमध्ये चांगलीच चिड आहे. हा शब्दही आता सर्वसामान्यांना नकोसा झालाये. त्यामुळे वाढलेल्या लॉकडाऊनसाठी आता पंतप्रधानासह मुख्यमंत्रीही अनलॉक हा शब्द वापरत आहे. यात अनेक सेवा सुविधांना सशर्त परवानगी देण्यात येत आहे.

व्यवसायिकांनी त्यांचे दुकाने सुरू करून अवघे काही दिवस झाले आहेत. त्यांची गाडी अद्यापही रुळावर आलेली नाही. हिच परिस्थिती मजूर, हमाल वर्गाची आहे. त्यांनी आधीच झळा सहन केल्यानंतर आणखी पाच दिवसांच्या जनता कर्फ्यूंची गरज आहे का? हा प्रश्न उपस्थित होणारच. देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे लॉकडाऊन शिथिल करून अर्थव्यवस्था रुळावर आणणे सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर कोरोनासोबत जगायला सांगतात. जिथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहे तिथेही अनलॉककडे वाटचाल करून लोकांसह व्यवसायिकांनाही वेठीस आणण्याचे टाळले जात आहे. असे असताना वणीत मात्र जनता कर्फ्यू लागू केला जात आहे.

जनता कर्फ्यू जाहीर करायला घाई?
जसा मोदींनी अचानक लॉकडाऊन जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला. तसाच वणीतील ‘जनता कर्फ्यू’चा प्रकार आहे. अचानक याची माहिती सर्वसामान्यांना मीडियाद्वारे दिली गेली. याबाबत माहिती झाल्यानंतर लोकांची पहिली प्रतिक्रिया कुणी ठरवले आणि कधी ठरले ही होती. अद्याप वणीकर लॉकडाऊनमुळे झालेल्या नुकसानातून तसेच बसलेल्या आर्थिक फटक्यातून सावरलेला नाही. वणीत सातवा रुग्ण सापडल्यानंतर जनता कर्फ्यूबाबत पहिली बैठक झाली. या प्राथमिक चर्चेनंतर यात व्यापकता आणून दुस-या बैठकीत इतरांनाही सहभागी करता आले असते. किमान सातव्या रुग्णाच्या संपर्कातील किती लोक पॉजिटिव्ह निघाले याची माहिती आल्यानंतर दुसरी बैठक घेता आली असती. मात्र तडकाफडकी जनता कर्फ्यू लागू करण्याचे कारण काय हे देखील अद्याप कळले नाही.

जनता कर्फ्यू म्हणजे स्वयंस्फुर्तीने आयोजित केलेला कर्फ्यू. यात स्वयंस्फुतीने सर्वसामान्य नागरिक सहभागी होतो. व्यापारी, व्यावसायिक सहभागी होतात. मजूरवर्ग सहभागी होतो. तो यशस्वी करण्यात प्रशासन मध्ये पडत नाही, ना कुणी पाळला तर त्यांच्यावर कारवाई केली जात. त्यामुळे अशा उत्स्फुर्त कर्फ्यूसाठी स्वयंस्फुर्तीने सहभागी होण्यासाठी जनतेला वेळ दिला गेला का? तो मानसिकदृष्ट्या 5 दिवसांसाठी तयार आहे का? जनता कर्फ्यू लावून आर्थिक नुकसान करण्याऐवजी वैद्यकीय सेवा देऊन हे नुकसान टाळता आले असते का? याचा विचार  जनता कर्फ्यू जाहीर करताना झाला का?

आधीच लॉकडाऊनने कंबरडं मोडलेल्या लोकांना धक्कातंत्राची नाही तर त्यांना विचारात घेऊन, वेळ देऊन निर्णय घेण्याची वेळ आहे.  उदया जर जनता कर्फ्यू न पाळून सर्वसामान्य जनतेने जर कर्फ्यू जाहीर करणा-यांना विचारात घेतले नाही, तर  हे त्यांच्यासाठीच धक्कातंत्र असू शकतो. महत्त्वाचे म्हणजे जे जनता कर्फ्यू लागू करत आहेत त्यांचे नेतेही कर्फ्यू व लॉकडाऊनबाबत आग्रही नाही. नरेंद्र मोदी आत्मनिर्भर बनायचा सल्ला देत आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनासोबत जागायचा सल्ला देत आहे. यासोबतच इतर नेत्यांचीही भूमिका ही लॉकडाऊनची नाही तर अनलॉकची असताना असा निर्णय नेत्यांद्वारे घेण्यात आलाच कसा हे एक कोडेच आहे.

Comments
Loading...