शहरात शुकशुकाट… जनता कर्फ्यूला उत्स्फुर्त प्रतिसाद

वणीतील रस्ते, मार्केट ओस... बार, भट्टी बंद तर वाईन शॉप सुरू

0 6,500

विवेक तोटेवार, वणी: शहरात पाच दिवसांचा जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला वणीकर जनतेने पहिल्या दिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. दुपारपर्यंत एकदोन अपवाद वगळता शहरातील सर्व दुकाने दुकाने बंद होते. बंदमुळे मार्केट, रस्ते ओस पडले होते. सर्व बंद असताना संपूर्ण शहरात केवळ वाईन शॉप सुरू असल्याने जनता कर्फ्यूत खोडा लागल्याचे बोलले जात आहे.

जाहिरात

जाहिरात

वणीत कोरोनाचा सातवा रुग्ण सापडताच खबरदारी म्हणून 5 दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय राजकीय पक्षातील नेत्यांनी घेतला. कोरोनाची शहरवासीयांनी लोकांनी चांगलीच धास्ती घेतल्याने त्याचा सकाळपासूनच प्रभाव दिसून आला. रोज सकाळी उघडणारे भाजी मार्केट आज बंद होते. केवळ एक दुसरा भाजी विक्रेता मार्केटमध्ये दिसून आला. मात्र तिकडेही ग्राहकांनी खरेदीसाठी जाणे टाळले. रोज सकाळी ठिक 7 वाजता गांधी चौकात सुरू होणारे फ्रुट मार्केटही आज सकाळी उघडले नाही. त्यामुळे त्या ठिकाणीही शुकशुकाट होता.

भाजी मार्केटमध्ये शुकशुकाट

वणीतील मुख्य मार्केट सकाळी 10 नंतर सुरू होते. मात्र सकाळी 10 नंतर कुणीही दुकाने सुरू केले नाही. त्यामुळे मार्केटमधला शुकशुकाट कायम होता. लोकांनी दूध, औषधी वेळेतच खरेदी केली. महत्त्वाचे म्हणजे कृषी केंद्राला ठरावीक वेळ सुरू राहण्यासाठी दिला असला तरी काही कृषी केंद्राने या वेळेत दुकाने उघडलेच नाही. दुपारपर्यंत केवळ शहरातील काही फळ व काही चिकन विक्रीचे दुकान सुरू होती. त्याव्यतिरिक्त इतर ठिकाणी सर्व ठिकाणी दुकाने बंद होती. तर मेडीकल असोसिएशनने जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होऊन सकाळी 7 ते स. 10 ऐवजी दुपारी 12 पर्यंत मेडिकल स्टोअर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. 12 नंतर मेडिकल स्टोअरही बंद करण्यात आले. दरम्यान वणीतील हॉस्पिटल सुरू आहे. ग्रामीण भागातील लोकांनीही आज वणीत येणे टाळले.

फक्त वाईन शॉप सुरू
जनता कर्फ्यू जाहीर होताच बार, भट्टी व्यावसायिकांनी तिथल्या कर्मचा-यांना सुटी दिल्याची माहिती आहे. आज बार आणि भट्टी (देशी दारु विक्रेते) चालकांनी आपले दुकान बंद ठेऊन त्यांनीही जनता कर्फ्यूला साथ दिली. मात्र शहरातील शाम (सुजाता) टॉकीज परिसरील वाईन शॉप सुरू होते. त्याठिकाणी लोकांची नेहमीसारखी गर्दी होती. भट्टीबंद असल्याने भट्टीतील ग्राहकांची गर्दीही शॉपकडे वळली.

जाहिरात

जाहिरात

बार व भट्टी बंद असल्याने वाईन शॉपवर गर्दी

‘भाऊं’चे एकला चलो रे…
काल संध्याकाळी खासदार बाळू धानोरकर यांची उपविभागीय अधिका-यांच्या कक्षात बैठक झाली. यात काही नेत्यांसह प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीनंतर जनता कर्फ्यूत प्रशासनाचा सहभाग नसल्याचे जाहीर करत जनता कर्फ्यूत सहभागी होण्याचे कुणावरही बंधन नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांनी जनता कर्फ्यूला समर्थन नसल्याचे जाहीर करताच आज ते त्यांच्या मालकीचे वाईन शॉप सुरू करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. सकाळी वाईन शॉप सुरू झाले. पण शहरात सर्व बार आणि भट्टी बंद असताना केवळ भाऊंचे वाईन शॉप सुरू असल्याने ते जनता कर्फ्यूत एकटे पडल्याची चर्चा शहरात रंगत आहे.

बँक व सरकारी कार्यालयही ओस
जनता कर्फ्यूमध्ये बँक आणि सरकारी कार्यालय वेळेत सुरू झाले. एरव्ही बँकेत ग्राहकांची एकच झुंबड उडालेली दिसते. मात्र जनता कर्फ्यूमध्ये बँकेकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने बँकेत शुकशुकाट दिसून आला. इतकंच काय तर सरकारी कार्यालय सुरू असतानाही अनेक कार्यालयात कार्यालयीन कामासाठी आलेले लोक तर सोडा कार्यालयातील कर्मचारीही गैरहरज दिसून आले.

शहरात जनता कर्फ्यूबाबत दोन मतप्रवाह आहे. अनेक लोक जनता कर्फ्यूचा समर्थनात आहे तर अनेकांनी याला विरोध केला आहे. रात्री खा. बाळू धानोरकरांनी जनता कर्फ्यू प्रकरणात उडी घेतल्यानंतर सोशल मीडियावर जनता कर्फ्यू कॅन्सल झाला अशी वावडी उठली होती. मात्र सकाळी सात वाजेपासून जनता कर्फ्यू स्वयंस्फुर्तीने सुरू झाला. जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी वणीकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. दरम्यान या कर्फ्यूत खा. बाळू धानोरकर एकटे पडलेले दिसले. आता उर्वरीत चार दिवस वणीकर जनता कर्फ्युला कसा प्रतिसाद देते याकडे वणीकरांचे लक्ष आहे.

Comments
Loading...