तुम्ही फक्त साद घाला, मी प्रतिसाद देईल: ठाणेदार शाम सोनटक्के
नवीन ठाणेदारांनी घेतली वणीकरांची भेंट
जितेंद्र कोठारी, वणी: कुठलीही अडचण असल्यास तुम्ही फक्त साद घाला, तुमच्या सादेला मी नक्कीच प्रतिसाद देईल. अशी ग्वाही आज वणीचे नवनियुक्त ठाणेदार पो.नि. शाम सोनटक्के यांनी दिली. आज बुधवारी दुपारी वणीतील महसूल भवन सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी वणी येथील नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. वणीचे ठाणेदार वैभव जाधव यांची बदली झाल्यामुळे पोलीस निरीक्षक शाम सोनटक्के यांना वणी पोलीस स्टेशनची जवाबदारी सोपविण्यात आली आहे.
येणारे सण उत्सव शांततेत पार पडावे, यासाठी ठाणेदार सोनटक्के यांनी वणीतील सामाजिक संघटना, पत्रकार संघटना, राजकीय पक्ष, महिला संघटना यांची एकत्र बैठकी बोलाविली होती. यावेळी महिला संघटना मुस्लिम समाज संघटना, कब्रिस्तान कमिटी, ओबीसी समाज समिती, रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी, व्यापारी असोसिएशन, वाणी समाज व संभाजी ब्रिगेड तर्फे पुष्पगुच्छ व रोपटे देऊन ठाणेदार सोनटक्के यांचा स्वागत करण्यात आले.
त्यानंतर मुख्याध्यापक गजानन कासावार व निलीमा काळे यांनी वणी शहरातील सांस्कृतिक व सामाजिक वारसाबाबत ठाणेदारांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की पदावर रुजू होताना पुष्पगुच्छ देऊन सर्वच स्वागत करतात. मात्र पदावरून जाताना पुष्पगुच्छ मिळणे हे महत्वाचे आहे. पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा व्यक्ती आचार विचाराने श्रीमंत होणे हे महत्वाचे आहे. असेही ते म्हणाले.
बैठकीत परिसरातील अवैध व्यवसायाच्या विषयाला बगल
वणी शहरात मोठ्या प्रमाणात मटका, जुगार, भंगार चोरी, कोळसा चोरी, रेती तस्करी व इतर अवैध व्यवसाय सुरु आहे. वणी येथे येणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यासमोर अवैध व्यवसायवर अंकुश लावणे हे सर्वात मोठा आव्हान असते. मात्र आजच्या बैठकीत या मुद्द्यावर कोणीही ब्र सुद्दा काढला नाही. तर ठाणेदारांनी सुद्दा अवैध व्यवसायावर आळा घालण्यासाठी त्यांची काय भूमिका राहणार. याबाबत काहीही स्पष्ट केले नाही.
वणी येथील गांधी चौक येथे अतिक्रमणमुळे वाहतुकीची मोठी समस्या असून याकडे लक्ष देण्याची विनंती नीलिमा काळे यांनी केली, त्यावर लवकरच या समस्येवर तोडगा काढू असे आश्वासन ही त्यांनी दिले. कार्यक्रमाचे संचालन आणि उपस्थितांचे आभार शेखर वांढरे यांनी मानले. यावेळी पत्रकार, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ता, मुस्लिम समाज बांधव, महिला संघटन पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे देखील वाचा:
Comments are closed.