वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना नववर्षाच्या अभिनव शुभेच्छा
वाहतूक पोलिसांनी केला ट्रिपल सीट चालकांचा सत्कार
ज्योतिबा पोटे, मारेगाव: नववर्षामध्ये वाहतुकीचे नियम तोडणा-यांचा मारेगाव पोलिसांकडून सत्कार करण्यात आला. शहरात ट्रिपल सीटने बाईकवर फिरणा-या बाईकचालकांची गाडी थांबवून त्यांचा गांधीगिरी पद्धतीने हार घालून सत्कार करण्यात आला. सोबतच पुढल्या वेळेस वाहतुकीचे नियम तोडल्यास किंवा ट्रिपल सीट दिसल्यास कार्यवाही करण्यात येईल अशी तंबीही त्यांना देण्यात आली. पोलिसांच्या या गांधीगिरी पद्धतीने राबवलेल्या कार्यवाहीची शहरात एकच चर्चा आहे.
शहरातील तरुणाई सध्या दुचाकीवर ट्रिपल सीट बसत असून सुसाट वेगाने वाहन चालवतात. त्यामुळे अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिक ट्रॉफिक पोलिसांनी दुचाकीवर ट्रिपल सिट बसलेल्यांचा नववर्षाच्या पर्वावर मापुष्पहार घालुन त्यांना शुभेच्छा दिल्या. जमादार वेट्टे पो. ना. नितीन खांदवे. पो कॉ किशोर आडे, राहूल बोंडे पोलीस मित्र दूर्गेश ढवळे पो. स्टे मारेगाव यांच्याद्वारे हा नवीन वर्षाचा अभिनव उपक्रम राबविन्यात आला.
मारेगावमध्ये गेल्या वर्षांत शहरातुन गेलेल्या चौपदरी हायवेवर अनेक छोटेमोठे अपघात झाले. त्यात अनेकांचा जीव गेला. येथील जिजाऊ चौक ते आंबेडकर चौक दरम्यान कुठेच गतिरोधक नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. जिजाऊ चौकात ऐन रहदारीच्या रस्त्यावर ऑटो चालक प्रवासी मिळावे म्हणून आपले वाहणे उभी ठेवतात. त्यामुळे अपघात होऊन अनेक जण जखमी झाले आहे. त्यामुळे अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी गांधीगिरी पद्धतीने पोलिसांनी हा उपक्रम राबवला असून यापुढे वाहतुकीचे नियम तोडणा-यांवर कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.