का आवरला नाही मोह त्यांना 40 वर्षांनंतरही त्या क्षणांचा
पुन्हा एस.पी.एम. विद्यालयाच्या जुन्या विद्यार्थ्यांनी केली धमाल
पुरुषोत्त्म नवघरे, वणी: हा दिवस खासच होता. शाळेत वेळेवर पोहोचण्याची सर्वांनाच घाई झाली होती. शाळेची घंटा वेळेवरच वाजली. जवळपास सर्वच विद्यार्थी शिस्तीनं वर्गात चालले. यावेळी मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच कुतूहल आणि औत्सुक्य होतं. आज वर्गात काय मस्ती करायची, कुणाची मजा घ्यायची, काय गमती करायच्या याचं प्रत्येकाच्याच डोक्यात प्लानिंग सुरू होतं. अत्यंत कडक शिस्तीच्या शिक्षकांचाही या क्षणाला धास्तीही उरली नव्हती. कारणही तसं खासच होतं. वणीच्या एसपीएम हायस्कूलचे माजी विद्यार्थी तब्बल 40 वर्षांनंतर आपल्या शाळेत एकत्र आले होते.
बालपणाचा तो रम्य काळ तब्बल 40 वर्षांनंतर उभा केला. जुने विद्यार्थी पुन्हा एकदा एकत्र जमलेत. आपल्या सोनेरी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. अलिबाबाची गुहा उघडावी तसा आठवणींचा खजिना डोळ्यासमोर आला. ही मैफल केवळ एक भेट नव्हती, तर ती होती अनेक वर्षांच्या आठवणींचा साठा, स्नेह आणि नॉस्टॅल्जियाचा अविस्मरणीय सोहळा. एस.पी.एम. विद्यालयाच्या प्रांगणात हा भावनिक क्षण सर्वांनी अनुभवला. आपापल्या आयुष्यात वेगवेगळ्या क्षेत्रांत स्थिरावलेल्या मित्रांनी बऱ्याच काळानंतर एकमेकांना पाहिलं. तेव्हा चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि डोळ्यातून ओघळलेले आनंदाश्रू हे शब्दांच्याही पलीकडलं होतं.. ४० वर्षांपूर्वी याच बाकांवर एकत्र बसून शिक्षण घेतलेले, एकत्र खेळलेले, खोड्या काढलेले आणि स्वप्ने पाहिलेले ते दिवस डोळ्यासमोर उभे झाले होते.
या स्नेहमेळाव्याची सुरुवात दीपप्रज्वलन आणि शाळेच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या गीतांनी झाली. त्यानंतर प्रत्येक मित्राने आपापल्या जीवनातील अनुभव, प्रवास आणि आतापर्यंतची वाटचाल थोडक्यात सांगितली. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत, त्यांनी जुन्या शिक्षकांना आणि शाळेलाही आदराने आठवले. यावेळी, अनेक मित्रांनी शाळेसाठी काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त केली. काही जणांनी शाळेच्या विकासासाठी आर्थिक मदतीची घोषणा केली, तर काहींनी भविष्यात नियमितपणे अशा भेटीगाठी आयोजित करण्याचा संकल्प केला. शालेय जीवनातील गमतीजमती, शिक्षकांचे किस्से, अभ्यासातील अडचणी आणि मैदानावरच्या खेळांच्या आठवणींनी वातावरण भारून गेले होते.
या मैफलीमुळे, एकमेकांपासून दुरावलेल्या मित्रांना पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळालीच, पण त्यासोबतच मैत्रीचे अतूट नाते किती घट्ट असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. एस.पी.एम. विद्यालय, वणीच्या या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याने हेच दाखवून दिले की, आयुष्यात कितीही बदल झाले तरी, बालपणीची मैत्री आणि शाळेच्या आठवणी या कायम हृदयात घर करून राहतात. हा दिवस या सर्व मित्रांसाठी एक अविस्मरणीय ठेवा बनून राहील. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी सतीश चांदेकर, उमाकांत गौरकार , प्रशांत उदापूरकर , प्रसन्न अठरकर , विलास खामनकर, प्रदीप खामनकर. किशोर गिरडकर, गणेश सोनी, प्रवीण उंबरकर, सुशील चिंडालिया, यादव सातपुते, डॉ. मिलिंद कोंडावार , सुनील पारखी, प्रमोद सुर, अभय मंगदे, संजय गोहोकार , पुरुषोत्तम गोहोकार, रामदास मडावी , राजेश मैलारपवार , रवी कुंठावार, शाबुद्दीन अजानी, चंद्रकांत तळसे, हिरेन शहा, सुनील आलोने , अशोक बोबडे, मुकिंदा किटकुले, नंदकिशोर कोहळे, विलास हेपट, मकरंद आचार्य, जावेद हैदरी, संतोष घुले, अंकुश थेरे , प्रमोद पाचभाई , रवी चंदनखेडे , प्रशांत माधमशेट्टीवार, अरुण पुरी, संजय शेंडे, सूर्यभान डाहुले ,रमेश अग्रवाल उपस्थित होते.



Comments are closed.