बहुगुणी डेस्क, वणी: शेतीचा वादावरून एकाला तिघांनी लाथाबुक्यांसह काठीने मारहाण केली. वांजरी येथे स. 8.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. भाऊजी व बहिणींशी शेतीच्या कारणावरून सारखा का भांडतो अशी विचारणा करीत शेजा-याच्या साळ्याने व त्याच्या मित्रांनी ही मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी जखमी झाले असून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी राहुल आनंदराव आसुटकर (41) हे वांजरी येथील रहिवासी असून ते शेती करतात. त्यांच्या घराशेजारी एक कुटुंब राहते. त्यांच्या शेजा-याचे शेत देखील आसुटकर यांच्या शेताशेजारीच आहे. शेती लागूनच असल्याने शेतीच्या कारणावरून या दोन कुटुंबात नेहमी वाद सुरु असतो. मंगळवारी दिनांक 3 जून रोजी राहुल घराजवळील रोडवर उभा होता. दरम्यान तिथे शेजा-याचा साळा त्याच्या दोन मित्रांना घेऊन आला.
त्यांनी राहुलला माझी बहिण व भाऊंजीसोबत भांडण का केले अशी विचारणा केली व राहुलला मारहाण करण्यास सुरुवात केली. साळ्याने बाजूला असलेली एक काठी उचलली व काठीने राहुलच्या डोक्यावर प्रहार केला. यात त्यांचे डोके फुटले. यापुढे बहिण व भाऊजींना त्रास दिला तर सोडणार नाही, अशी धमकी देऊन ते तिघे तिथून निघून गेले.
राहुलने वणी पोलीस स्टेशन गाठले व याबाबत तक्रार दिली. मेडिकल रिपोर्टवरून पोलिसांनी आरोपी नीलेश संतोष सातपुते (35) व त्याच्या दोन मित्रांवर बीएनएसच्या कलम 118 (1), 351 (2), 351 (3) व 3 (5) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.
Comments are closed.