जब्बार चीनी, वणी: कोविड केअर सेन्टरबाबत रुग्णांच्या सततच्या तक्रारीनंतर आता कोविड केअर सेन्टरमध्ये आयसोलेशन वार्डात राहण्यापेक्षा रुग्णांना होम आयसोलेशनची परवानगी देण्यात आली आहे. ज्या रुग्णांकडे आयसोलेशनची पुरेशी व्यवस्था आहे, अशा रुग्णांना ही सुविधा दिली जात आहे. अशी माहिती वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी ‘वणी बहुगुणी’जवळ दिली. सध्या शहरातील 4 कोविड पॉजिटिव्ह सध्या होम आयसोलेट असल्याची माहिती आहे. याआधीच जिल्हा प्रशासनाने खासगी रुग्णालयात कोरोनाचा उपचार घेण्यास परवानगी दिली आहे. वणीतील एक रुग्ण यवतमाळ येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचीही माहिती आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या तसेच कोविड केअर सेन्टरमधल्या आयसोलेशन वार्डात रुग्णांची होणारी गैरसोय व वाढत्या तक्रारीमुळे शासनाने आधीच मोठ्या शहरात कोविड पॉजिटिव्ह मात्र लक्षणं नसलेले किंवा सौम्य लक्षणं असणा-यांना होम आयसोलेशनची सुविधा दिली होती. ही सुविधा ज्यांच्याकडे होम आयसोलेशनची पुरेशी व्यवस्था आहे अशा व्यक्तींना मिळत होती.
वणीत देखील ही मागणी सातत्याने सुरू होती. अखेर प्रशासनाने होम आयसोलेशनसाठी वणी तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांना होम आयसोलेशनची परवानगी दिली आहे. सध्या वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीत असलेल्या 2 व्यक्ती व त्यांच्या कुटुंबातील 2 अशा एकूण 4 व्यक्ती होम आयसोलेट असल्याची माहिती मिळतआहे.
होम आयसोलेशनची सुविधा कुणाला मिळणार?
जी व्यक्ती संशयीत असते अशा व्यक्तींना कॉरन्टाईन (विलगीकरण) केले जाते. तर जी व्यक्ती पॉजिटिव्ह आहे अशा व्यक्तींना आयसोलेट (अलगीकरण) केले जाते. शासनाने होम आयसोलेशनसाठी काही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. यात त्या व्यक्तींच्या घरी आयसोलेशनसाठी वेगळी व्यवस्था असावी, घरातील राहणारे इतर व्यक्तीच्या संपर्कात ती व्यक्ती येऊ नये, सेपरेट टॉयलेट बाथरूमची व्यवस्था असावी. आयसोलेशनचा कालावधी संपल्यानंतरही त्या व्यक्तीला आणखी काही दिवस कॉरन्टाईन राहावे लागेल. असे काही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. यात तत्वात बसत असणा-या रुग्णांना होम आयसोलेशनची सुविधा सध्या दिली जात आहे.
कॉरन्टाईन व्यक्तींना ही सुविधा मिळणार का?
ज्या व्यक्ती संशयीत आहेत. त्या व्यक्तींना कॉरन्टाईन केले जाते. आधी शहरातील संशयीतांना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरही खबरदारी म्हणून तीन चार दिवस कॉरन्टाईन केले जात होते. त्यानंतर त्या व्यक्तीला सुटी देऊन त्यांच्या हातावर शिक्का मारून त्यांना 14 दिवसांसाठी होम कॉरन्टाईन केले जायचे. सध्या रॅपिड ऍन्टिजन टेस्ट आणि आरटीपीसीआर अशा दोन पद्धतीने कोरोनाच्या टेस्ट सुरू आहेत. रॅपिड ऍन्टिजन टेस्ट ही तात्काळ येते. त्यामुळे या टेस्टमध्ये निगेटिव्ह आल्यास त्या व्यक्तीला आता तात्काळ सुटी दिली जाते. तर आरटी पीसीआर (स्वॅब) नुसार टेस्ट केलेल्या संशयीतांना टेस्टचा रिपोर्ट येत पर्यंत परसोडा येथील कोविड केअर सेन्टरमध्ये कॉरन्टाईन केले जात आहे.
परसोडा येथील कोविड केअर सेन्टरबाबत अनेक तक्रारी आहेत. रुग्ण तसेच संशयीत तिथे असलेल्या गैरसोयीमुळे तसेच अस्वच्छतेमुळे तिथे राहण्यास धजावत आहेत. आता कोरोना रुग्णांना होम आयसोलेशनची परवानगी दिल्याने, संशयीतांनाही तात्काळ होम कॉरन्टाईनची सुविधा द्यावी अशी मागणी जोर धरू शकते. संशयीतांनाही प्रशासन तात्काळ होम कॉरन्टाईनची सुविधा देणार का? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.