घोन्सा खाणीत दरोड्याचा प्रयत्न, वेकोलि सुरक्षा रक्षकावर हल्ला

MSF जवान येताच चोरट्यांनी काढला पळ, एक चोरटा ताब्यात...

जितेंद्र कोठारी, वणी: कोळसा खाणीतील भंगार व इतर साहित्य चोरण्याच्या उद्देशाने काही चोरटे शस्त्र घेऊन खाणीत शिरले. त्यांनी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. मात्र दरम्यान घटनास्थळी MSF (खाण सुरक्षा दल) चे जवान दाखल झाले. जवान येताच चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र एक चोरटा जवानांच्या हाती लागला. या प्रकरणी सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली 

घोन्सा येथील कोळसा खाण परिसरात मोठ्या प्रमाणात लोखंड, अॅल्युमिनियम, तांबे इत्यादी धातुंचे साहित्य तसेच मशिन्स आहेत. हे साहित्य मौल्यवान असल्याने चोरट्यांचा या साहित्यावर डोळा आहे. साहित्याची चोरी होऊ नये म्हणून खाणीत सुरक्षा रक्षकांची देखरेख असते. शिवाय संपूर्ण खाणीची जबाबदारी MSF (मायनिंग सेक्युरिटी फोर्स) कडे दिली आहे.   

रविवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास काही चोरटे हे कु-हाड व इतर हत्यार घेऊन खाणीतील साहित्य चोरण्याच्या उद्देशाने खाण परिसरात शिरले होते. त्यावेळी सुभाष दादाजी नरांजे (36) हे सुरक्षा रक्षक कर्तव्यावर होते. चोरट्यांनी सुभाष यांच्यावर धावा बोलला. त्यांनी कु-हाडीच्या मागच्या बाजूने सुभाष यांना बेदम मारहाण केली. 

दरम्यान त्याच वेळी MSF (खाण सुरक्षा दल) चे जवान गस्तीवर होते. चोरट्यांच्या मारहाणीमुळे झालेल्या गोंधळामुळे ते घटनास्थळी पोहोचले. जवानांची गाडी आढळताच चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. जवानांनी त्याचा पाठलाग केला. दरम्यान एक चोरटा पळताना खाली पडला वे तो  त्यांच्या हाती आला. जवानांनी दरोडेखोराला पोलिसांच्या स्वाधीन केले.

सदर प्रकरणी सुरक्षा रक्षक सुभाष नरांजे यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात भादंविच्या कलम 395, 353, 332 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या वणी पोलीस फरार दरोडेखोरांचा शोध घेत आहे.

हे देखील वाचा:

मुलीच्या आत्महत्येपाठोपाठ वडिलांचाही विष प्राषन करून आत्महत्येचा प्रयत्न

जैन ले आउट येथील गुरूपीठ इंग्लिश मीडियम स्कूलसाठी प्रवेश सुरू

Comments are closed.