जब्बार चीनी, वणी: दोन दिवसांपूर्वी परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन झालेल्या व्यक्तीचे स्वॅब (तपासणी नमुने) आज यवतमाळला पाठविल्याची माहिती आहे. सदर व्यक्ती काही दिवसांपूर्वी अकोला येथून शहरातील जैताई नगर परीसरात आली होती व होम क्वारंटाईन होती.
प्राप्त माहिती नुसार 10 ते 12 दिवसांपूर्वी अकोल्यावरून एक व्यक्ती वणीत आली होती. या व्यक्तीला घरीच कॉरेन्टाईन करण्यात आले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी त्या व्यक्तीला ताप आल्याची माहिती आरोग्य विभागाला कळताच त्याला परसोडा येथील कोविड केअर सेंटर मध्ये हलविण्यात आले. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून आज गुरूवारी त्या व्यक्तीचे स्वॅब यवतमाळला पाठविण्यात आले आहे.
आतापर्यंत 2974 होम क्वारंटाईन
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर बुधवारपर्यंत वणी शहरासह तालुक्यात 2 हजार 974 व्यक्तींनी घरवापसी केली आहे. त्यातील 2 हजार 302 जण 14 दिवसांचा कालावधी संपल्याने कोरोनाच्या परिघाबाहेर निघाले आहेत. तर 592 लोक अद्यापही होम क्वारंटाईन आहे. आरोग्य विभागाची त्यांच्यावर करडी नजर आहे. मुळचे वणी लॉकड़ाऊनपूर्वी पुणे, मुंबई व इतर भागात असलेले शेकडो लोक वणीत पोहोचले. त्यात परदेशात असलेल्या 16 जणांचाही समावेश होता.
बुधवारपर्यंत 572 लोक होम क्वारंटाईन करण्यात आले असून यापैकी वणी शहरातील 194 तर ग्रामीण भागातील 398 लोकांचा समावेश आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये अडकलेले अऩेक लोक मिळेल त्या मार्गाने वणीत परतत आहे. तपासणीमध्ये ताप दिसू नये म्हणून अनेक लोक ताप कमी करण्याच्या गोळ्या खातात. परिणामी योग्य ते निदान होत नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय कोणालाही औषधी देऊ नये अशी सूचना मेडिकल स्टोअर्सला करण्यात आली आहे.
वणी – यवतमाळ मार्गावरील परसोडा येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरवर व ग्रामीण रूग्णालयात सर्वांची नियमीत तपासणी केली जात आहे. जर कोणाला सर्दी, ताप व खोकला असल्यास त्यांनी तत्काळ ग्रामीण रूग्णालयाशी संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
क्वारंटाईन व्यक्तींची तपासणी मोबाईल व्हॅनद्वारा – डॉ. जावळे
होम क्चारंटाईन व्यक्तींची तपासणी मोबाईल व्हॅन पथकाद्वारा केली जात आहे. या पथकाकडे थर्मल स्कॅनर व पल्य आँक्सीमीटर उपलब्ध असून आतापर्यंत 86 गावांत 321 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. लवकरच ही तपासणी शहरात ही सुरू केली जाणार आहे. विनाकारण कुणीही घराबाहेर पडू नये तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून नेहमी मास्कचा वापर करावा. तसेच कोणत्याही अफवांना बळी पडू नये.
– डॉ. शरद जावळे, उपविभागीय अधिकारी