परिसरात ऑनलाईन पाकीटमारी, सर्वसामान्यांची फसवणूक
कधी होणार सायबर दरोडेखोरांचे रॅकेट उद्ध्वस्त ?
जब्बार चीनी, वणी: केंद्र शासनाच्या सूचनेनुसार बॅंका, प्रशासनाकडून सर्व नागरिकांना कॅशलेश व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. बहुतांशी युवक-युवती तसेच व्यावसायिक आपले व्यवहार ऑनलाईन करीत आहेत. मात्र, सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या पध्दतीने ग्राहकांना ऑनलाईन गंडा घालत आहेत. त्यामध्ये वेबसाईटच्या माध्यमातून वस्तू कमी किमतीस देण्याचे आमिष दाखवून लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. ऑनलाईन स्वस्तातील खरेदीच्या आमिषाला ग्रामीण भागातील तरुण सहज बळी पडत आहेत. पोलिसांकडूनही तक्रारी नोंदविण्यापलीकडे कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे अशा गुन्हेगारांचे चांगलेच फावले आहे.
आपल्या बॅंकेने डेबिट क्रेडिट कार्ड बंद केल्याची बतावणी करून ओटीपी नंबर मागून खात्यावरची रक्कम गायब केली जाते. त्याचबरोबर सायबर गुन्हेगारांनी लोकांना फसविण्यासाठी नवनव्या पध्दतींचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. फसवणुकीची रक्कम कमी असल्यामुळे खासकरून ग्रामीण भागातील तरूण व व्यावसायिक जाळ्यात ओढले जात आहे.
शहर परिसरातील व ग्रामीण भागातून ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. तक्रार देण्यास गेलेल्या नागरिकांना स्थानिक पोलीस ठाण्यात वणी सायबर सेलला जाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे फसवणूक झालेली व्यक्ती फसवणुकीची रक्कम कमी असल्यामुळे तक्रार देण्यात रस दाखवत नाही. अशीच एक घटना शहरालगत असलेल्या एका हॉटेल व्यावसायिकासोबत सोबत नुकतीच घडली.
आर्मी ऑफिसर सांगून हॉटेल चालकाला गंडा
सायंकाळी 7 च्या सुमारास फोन करून आम्ही आर्मी ऑफिसर असून येथे 30 जवानांचा कॅम्प आला असून ऑनलाईन सर्चमधून तुमचा नंबर मिळालेला आहे. आम्हाला तीस जवानांच्या जेवणाची ऑर्डर द्यायची आहे. असे सांगून बिलाच्या रकमेसाठी व्हॉटस् अॅपव्दारे मॅसेज करून फॅार्म भरण्यासाठी दिला. त्यामध्ये बॅंक खाते, ए.टी.एम. ची माहिती मागवण्यात आली. हॉटेल चालकाने आर्मीचे नियम असतील असे समजून माहिती दिली. त्यानंतर ओ.टी.पी. मागण्यात आला. हॉटेल चालकाने शंका उपस्थित केल्यानंतर हे आर्मीचे नियम असल्याचे सांगण्यात आले.ओ.टी.पी. दिल्यानंतर खात्यातील रक्कम लंपास करण्यात आली. तयार झालेल्या 30 जणांच्या जेवणाची ऑर्डरचा खर्चही त्या व्यवसायिकास सोसावा लागला. तसेच राजुरचया एका युवकास फोनव्दारे आपल्याला पाच लाखाचे कर्ज मंजूर झाल्याची बतावणी करीत 20 हजारांना गंडा घालण्यात आला. अशा प्रकारे सोशल मीडियाचा वापर करून ग्रामीण भागातील युवकांना गंडा घालण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.
ऑनलाईन द्वारा लुबाडण्यात येणारी रक्कम कमी असल्याने तक्रार देण्यास नागरिक धजावत नाहीत. अलिकडे मेट्रो शहरांमध्ये असलेली ऑनलाईन दरोडेखोरी आता ग्रामीण भागांमध्ये ही फोफावू लागली आहे. त्यामुळे सायबर क्राईमच्या वेगवेगह्या पध्दतीबद्दल प्रबोधन होणे गरजेचे असून त्याबरोबरच पोलीस विभाग व बँकेतर्फे शिबिराचे आयोजन करणे आवश्यक बनले आहे.