अवैधरित्या औषधी विक्री करणे आले अंगलट

लक्ष्मीनारायण मेडिकलवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

0
Mayur Marketing

विवेक तोटेवार, वणी: शहरात वरोरा रोडवरील एका क्लिनिकमध्ये अवैधरीत्या औषध विक्री करणे वणीतील एका मेडिकल धारकास चांगलेच अंगलट आले असून या प्रकरणी संबंधीत प्रशासनाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. ज्या क्लिनिकमध्ये ही विक्री सुरू होती त्या डॉक्टरचा अहवाल जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत बोगस वैद्यकीय व्यावसायिक जिल्हास्तरीय पूनर्विलोकन समितीकडे देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

वरोरा रोडवर डॉ. मनीषा एकरे यांचे एकरे क्लिनिक या नावाने दवाखाना आहे. या क्लिनिक मध्ये बसून एक मेडिकल धारक औषध विक्री करीत असल्याची तक्रार औषध निरीक्षक म. वी. गोतमारे यांना मिळाली. गोतमारे यांनी 20 जुलै रोजी वणीत येऊन सदर क्लिनिकची तपासणी केली. यावेळी क्लिनिकमध्ये मोठया प्रमाणात औषध साठा मिळाला.

Lodha Hospital

या दवाखान्याची तपासणी केली असता क्लिनिकमध्ये औषध विक्री, वितरण व साठ्याबाबतचा कोणताही परवाना नसल्याने आढळून आले. तसेच तपासणी वेळी औषध साठ्याचे खरेदी बिलही सादर न करता आले नाही. त्यामुळे क्लिनिकमधला औषधींचा साठा जप्त करत औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 च्या कलम 18-A अंतर्गत डॉ. मनीषा एकरे यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली.

10 ऑगस्ट सोमवारी रोजी औषध निरीक्षक गोतमरे यांनी वणीतील क्लिनिक व मेडिकल धारक यांची चौकशी केली. दवाखान्यात बसून औषध विक्री करणारे संदीप मुजगेवार यांचे लक्ष्मीनारायण मेडिकल नावाने जत्रा रोड वणी येथे मेडिकल आहे. ते एकरे क्लिनिकमध्ये बसून डॉक्टरांच्या संमतीने औषधींची विक्री करीत असल्याचे समोर आले. तसेच जप्त करण्यात आलेली 20 हजार रुपयांची औषधी ही सुद्धा संदीप मुजगेवार यांची असल्याचे स्पष्ट झाले.

यात मेडिकल धारक संदीप मुजगेवार हे दोषी आढळल्याने त्यांच्यासह इतरांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले आहे. यामध्ये मेडिकल धारकाचा परवाना रद्द करण्यात येणार की नाही अजूनही स्पष्ट नाही. वणीत अशाप्रकारे अवैधरीत्या औषध विक्री करणाऱ्यांमध्ये काही होलसेलरही असल्याची माहिती आहे.

डॉक्टरवर कधी होणार कारवाई?
मेडिकल चालकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र या प्रकरणी डॉक्टरांच्या संमतीने क्लिनिकमध्ये औषधी विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत बोगस वैद्यकीय व्यावसायिक जिल्हास्तरीय पूनर्विलोकन समितीकडे देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यामुळे जशी मेडिकल चालकावर कार्यवाही करण्यात आली त्याच प्रकारे डॉक्टरांवरही कार्यवाही होणार का ? याकडे संबंधीत क्षेत्रातील व्यक्तींचे लक्ष लागले आहे.

कारवाईमुळे अवैधरित्या विक्री करणा-यांचे धाबे दणाणले आहे. सदर कारवाई सहआयुक्त यु बी घरोटे अमरावती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली म वी गोतमारे औषध निरीक्षक अमरावती व सहआयुक्त (प्रभारी) यवतमाळ यांनी केली.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!