विलास ताजने, वणी: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे परमडोह येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छत उडाले होते. मात्र जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाने अजूनही शाळेची डागडुजी केली नाही. परिणामी विद्यार्थ्यांना पावसाच्या दिवसात बाहेर बसून शिक्षण घ्यावे लागणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वणी तालुक्यातील परमडोह, चिखली, टाकळी या गावांना तीन जून रोजी झालेल्या वादळी पावसाचा फटका बसला होता. यात परमडोहच्या जिल्हा परिषद शाळेचे छत पूर्णपणे उडाले होते. यावेळी पावसामुळे शाळेतील डिजिटल शैक्षणिक साहित्यांचेही नुकसान झाले होते. येत्या २६ जून पासून शाळा सुरू होत आहे. त्याअनुषंगाने प्रभारी सरपंच संदीप थेरे यांनी निवेदनाद्वारे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना शाळेच्या छताची त्वरित डागडुजी करण्याची मागणी केली आहे. परंतु शिक्षण विभागाने मागणीकडे दुर्लक्ष केले.
बुधवार पासून शाळा सुरू होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था कुठे करावी, असा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर उभा ठाकला आहे. सरपंच संदीप थेरे यांनी संबंधित कामासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांच्याशी भ्रमणध्वनी वरून वारंवार संपर्क साधण्याचे प्रयत्न केले. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी संताप व्यक्त होत आहे. एकीकडे शहर स्मार्ट होत आहे. मात्र त्याचवेळी ग्रामीण भागातील प्राथमिक सोई सुविधांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्या जाते, ही खेदाची बाब आहे.