विलास जाधव यांच्या प्रकल्पाची राज्यस्तरीयसाठी निवड
निकेश जिलठे, वणी: उमरखेड येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये अनु जाती मुलांची निवासी शाळा परसोडा (परसोनी फाटा) या शाळेचे प्रयोगशाळा सहाय्यक विलास जाधव यांच्या कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी या प्रकल्पाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. आता या प्रकल्पाची निवड 43 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेली ही प्रदर्शनी 19 आणि 20 जानेवारीला उमरखेड येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात घेण्यात आली होती. यात जिल्ह्यातून सुमारे 112 प्रयोग आले होते. यात प्रयोगशाळा परिचर या वैयक्तक गटात विलास जाधव यांच्या लोकशिक्षणावर आधारीत प्रकल्प सादर केला होता. त्यांनी कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी यावर आधारित ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलासाठी प्रेरणादायी संदेश देणारी प्रतिक्रुती तयार केली होती.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये फवारणी करताना 22 लोकांचा मृत्यू झाला. आता 23 वा मृत्यू होऊ नये यासाठी कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी हा विषय घेऊन प्रकल्प तयार केला होता. या प्रकल्पाची शासनस्तरवर देखील दखल घेतली जात आहे. अशी माहिती विलास जाधव यांनी वणी बहुगुणीला दिली. त्यांच्या या यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकोत्तर कर्मचारी, मुख्यध्यापक यांनी कौतुक केले असून त्यांना राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
चालू शैक्षणिक सत्रातील दिनांक 19 व 20 डिसेंबर 2017 या कालावधीत जि प माजी शासकिय माध्यमिक शाळा वणी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी घेण्यात आली होती. यातही अनु जाती मुलांची निवासी शाळा परसोडा (परसोनी फाटा) या शाळेने नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. या प्रदर्शनीमध्ये सर्व गटात या शाळेने सहभागी होऊन सर्व गटात प्रथम क्रमांक पटकावला होता.