गुलाबी बोंड अळीचे राजकारण, विरोधक निवेदनात मग्न, सत्ताधारी सुस्त
बोंडअळीच्या प्रकोपाने शेतकरी हवालदिल
ज्योतिबा पोटे, मारेगाव: सध्या कपाशीवर गुलाबी बोंड अळीनं परिसरात धुमाकुळ घातला आहे. शेतक-यांचं मोठ्या प्रमाणात या अळीनं नुकसान केलं आहे. मात्र यावर सत्ताधा-यांकडून कोणतीही मदत मिळत नाहीये. तर विरोधक केवळ याचं राजकारण करून केवळ निवेदनावर निवेदन देत आहे. गेल्या एक महिन्यांपासून शेतक-यांना मदत मिळावी यासाठी निवेदन सुरू आहे. मात्र शेतक-यांच्या या समस्येकडे सत्ताधारी दुर्लक्ष करत असतानाही त्यावर कोणतीही आक्रमक भूमिका घेताना दिसत नाही.
सध्या तालुक्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचलेला आहे. पहिले कीटकनाशकाची विषबाधा आणि आता गुलाबी बोंड अळीने आक्रमण केले आहे. या अळीवर नियंत्रण करण्यासाठी शेतक-यांना फवारणी औषधाची गरज आहे. मात्र कृषी केंद्र चालक शेतक-यांना औषध देत नाही. त्यामुळे गुलाबी अळींचा प्रकोप वाढत आहे. तर दुसरीकडे विरोधक मात्र केवळ निवेदन देण्यातच धन्यता मानत आहेत. चार जण गोळा व्हायचे निवेदन द्यायचे आणि त्याचे फोटो छापून आणून सवंग प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आज ह्या निवेदनचा शासनावर काडीमात्र परिनाम होत नसताना दिसत आहे. मात्र एवढे होऊनही विरोधकांमध्ये अजूनही शेतक-यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची हिम्मत होत नाही आहे. एकीकडे सत्ताधारी शेतक-यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी निष्क्रिय झाल्याने शेतक-यांना कोणताही न्याय मिळत नसल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.