अडेगाव येथे पारंपरिक पोळा सण उत्साहात साजरा

बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करून पोळ्याला सुरवात

0

देव येवले, मुकुटबन: शेतकर्‍याचा मित्र समजल्या जाणार्‍या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण अडेगावात उत्साहात साजरा करण्यात आला. त्यातच पोळ्याच्या आधी पावसानं दमदार हजरी लावल्याने शेतकरी बांधवांच्या उत्साहात भर पडली. त्याचा प्रत्यय पोळा सणानिमित्त दिसून आला.

सोमवारी बसस्टॉप जवळ पोळा मोठ्या प्रमाणात भरविण्यात आला. त्या निमित्याने शेतक-यांचा राजा बळीराजा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पूजनाचा मान शंकर आसुटकर व उद्रुजी भेदुरकार यांना देण्यात आला. त्या नंतर नुकत्याच ह्रदयविकारच्या झटक्याने निधन झालेले शेतकरी मारोती काळे यांना मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी विलास शेरकी यांनी पोळ्याचे महत्त्व समजाऊन सांगितले. ज्या बैलांकडून शेतकरी शेतीत मशागतीची कामे करून घेतो त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त बैलांना दोन दिवस कामासाठी विश्रांती देण्यात आली होती.

पोळा सणाच्या आदल्या दिवशी खांदेमळणी करण्यात आली. यानिमित्त बैलाच्या खांद्यास हळद व लोणी लावण्यात आले होते. सोमवारी सकाळपासून बैलांना सजवण्यात शेतकरी बांधवांसह तरुणाईची लगबग सुरू होती. सकाळीच बैलांना आंघोळ घातण्यात आली. नंतर बैल विविध परीने सजवण्यात आले. बस स्टाप जवळ मोठ्या प्रमाणात शेतक-यांनी सहभाग दर्शिविला. गुडी फिरवून पोळा फुटला. भजना लावून बैलांची मिरवणूक काढण्यात आली.

गावातील मारुतीचे दर्शन झाल्यानंतर घरी परतलेल्या मानाच्या बैलांना घरमालकीणीने औक्षण करत पुरणपोळी खाऊ घातली. पारंपरिक पद्धतीने बैलास मान देण्यात आला.

(हे पण वाचा: आदर्श विद्यालयात शिक्षक, पालक व विद्यार्थी सभा संपन्न)

Leave A Reply

Your email address will not be published.