पोल चोरणाऱ्यांची झाली ‘पोल-खोल’

वेकोलीचे पोल चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कोलार पिपरी उपक्षेत्रात बंद असलेल्या गोवारी खाणीतून 5 ऑक्टोबर रोजी 40 हजार रूपये किमतीचे 18 नग पोल चोरी गेले होते. तशी तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रारीनुसार वणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 279 नुसार गुन्हा नोंद केला होता. या पोल चोरणाऱ्यांची ‘पोल-खोल’ वणी पोलिसांनी तातडीने केली. 6 ऑक्टोबर बुधवारी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या चोरीतील तीन आरोपींना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.

तालुक्यात भंगार चोरटे गेल्या अनेक दिवसांपासून सक्रिय आहेत. वणी तालुक्यातील कोलार पिपरी उपक्षेत्रामध्ये असलेली गोवारी खाण बंद आहे. या ठिकाणी विद्युत पुरवठ्याकरीता लोखंडी खांब लावण्यात आलेले आहेत. चोरट्यांनी शक्कल लढवत विद्युत पुरवठा बंद करून सदर 18 लोखंडी पोल आरीच्या साहाय्याने कापून काढले. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी अशोक चारुदत्त ठाकरे (40) गोवारी कोना, नीलेश गजाननराव आवरी (23) कोना, अमृत नात्थूजी हटुलकर (35) नवीन वागदरा यांना अटक केली.

आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर सदर पोल हे भंगार व्यापारी युनूस मोहम्मद रफिक (33) व अब्दुल कमर अब्दुल गफ्फार (45) यांना विकल्याचे सांगितले. पोलिसांनी दुकानात पोहचून पोलचे 36 तुकडे किंमत अंदाजे 22100 जप्त केले. तर आरोपी नीलेश आवरी याच्याकडून 8 नग लोखंडी पोल किंमत 17600 रुपयाचे जप्त केले. असा एकूण 39 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नाईक व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख गोपाल जाधव,सुदर्शन वानोळे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, दीपक वाड्रसवार, अमित पोयाम, पंकज उंबरकर यांनी केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.