चोख पोलीस बंदोबस्तात दुर्गा मातेला देणार निरोप

टागोर चौकात शांतता कमेतीद्वारे होणार स्वागत

0 252

विवेक तोटेवार, वणी: बुुधवारी 9 ऑक्टोबर आणि गुरुवारी 10 ऑक्टोबर रोजी दुर्गा मातेला निरोप देण्यात येणार आहे. शहरात अनेक ठिकाणी मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात दुर्गा मातेला निरोप देणार असल्याची माहिती आहे. दुर्गा मातेचे विसर्जन बुधवार आणि गुरुवार या दोन दिवशी करण्यात येणार आहे. यामध्ये टिळक चौकापासून ते बसस्थानक परिसर बुधवारी आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी टिळक चौकापासून ते दीपक चौपाटी परिसरातील मातेचे विसर्जन होणार आहे.

29 सप्टेंबर रविवारी नवरात्र सुरू झाले. मोठ्या थाटात मातेचे आगमन झाल्यानंतर 10 दिवस कसे निघून गेले हे भक्तांना समजलेही नाही. आता मातेला निरोप देण्याचा दिवस आला आहे. याबाबत पोलिसांनी आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. वणीत व वणी ग्रामीण मध्ये परवाना प्राप्त एकूण 240 दुर्गा मंडळ आहेत. त्यापैकी बुधावरी शहरातील 54 व ग्रामीण मधील 89 असे एकूण 143 दुर्गा विसर्जन होणार आहे. याकरिता 4 पोलीस अधिकारी 30 कर्मचारी व 35 होमगार्ड दिवसरात्र कार्यरत राहणार आहे.

बुधावरी टिळक चौक ते चिखलगाव बसस्थानक परिसरातील दुर्गा मातेचे विसर्जन होणार आहे. तर गुरुवारी टिळक चौकापासून ते दीपक चौपाटी या परिसरातील मातेचे विसर्जन होणार आहे. डिजेला पूर्णपणे बंदी असून रात्री 10 वाजेपर्यंत बँड वाजविण्याची परवानगी राहणार आहे. यातील कर्मचारी प्रत्येक चौकात ज्यामध्ये जामा मशीद, मदिना मशीद, टिळक चौक, खाती चौक, आंबेडकर चौक कर्तव्यावर राहणार आहेत.

सर्व दुर्गा मंडळाच्या अध्यक्षांचे स्वागत टागोर चौकात शांतता कमेतीद्वारे करण्यात येणार आहे. सदर सर्व कर्मचारी हे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नाईक व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मागदर्शनात आपल्या कर्तव्यावर राहणार असल्याची माहिती गोपनीय विभागातील पोलीस कर्मचारी विजय राठोड यांनी वणी बहुगुणीला दिली.

Comments
Loading...