विवेक तोटेवार , वणी: रंगनाथ स्वामी परिसरातील पोलीस चौकी 30 मार्च पासून सुरू करण्यात आली. या ठिकाणी कायमस्वरूपी चार पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. या परिसरात पोलीस चौकी सुरू करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून वणीकर करीत होते. शेवटी ठाणेदार वैभव जाधव यांच्या प्रयत्नाने ही चौकी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.
रंगनाथ स्वामी परिसरात भाग्यशाली नगर, गोकुल नगर, शास्त्रीनगर, खडबडा, रंगनाथ नगर हा परिसर येतो. या ठिकाणी गुन्ह्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे गुन्हेगारांना आळा बसावा म्हणून या ठिकाणी पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी पत्रकारांनी केली होती.
या ठिकाणी एक सपोनि व तीन पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोबतच यातील कोणतेही दोन कर्मचारी हे सतत 24 तास हजर राहतील. वणीकरांच्या मागणीला मान देऊन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार व ठाणेदार वैभव जाधव यांनी या ठिकाणी जुन्या पोलीस चौकीची रंगरंगोटी करून पोलीस चौकी सुरू केली आहे.
चौकी सुरू झाल्याने नक्कीच या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल. शांतता कमिटीच्या बैठकीतही सदर परिसरात पोलीसांची नियुक्ती करून पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. यामागचे कारण म्हणजे या परिसरातील तक्रारी मोठ्या प्रमाणात वणी पोलिसात दाखल होत असतात. येथील गुन्हेगारी लक्षात घेता ही चौकी सुरू करण्यात आल्याची माहिती ठाणेदार वैभव जाधव यांनी दिली. या निर्णयाने वणीकरात आनंदाचे वातावरण आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा