जब्बार चीनी, वणी: जे व्यक्ती विनाकारण बाहेर न पडता केवळ आवश्यक कामासाठीच बाहेर निघून प्रशासनाला सहकार्य करीत आहे अशा लोकांचा पोलिसांतर्फे आगळावेगळा सन्मान करण्यात आला आहे. आज वणीत पोलीस विभागातर्फे जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी बाहेर निघणा-या व्यक्तींना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. याशिवाय छोटे भाजी, फळ विक्रेते यांनाही मास्कचे वाटप करण्यात आले. वणीतील टिळक चौक, गांधी चौक इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस लॉकडाऊनचे महत्त्व सांगून त्यांना मास्क वाटप करत होते.
संचारबंदीला वणीकरांनी आधी चांगला प्रतिसाद दिला मात्र त्यानंतर काही लोकांनी शिस्त मोडत बेजबाबदारीचे दर्शन घडवले. परिणामी पोलीस विभागाला कठोर भूमिका घ्यावी लागली. त्यामुळे अनावश्यक बाहेर निघणा-या काही लोकांना काठीचा प्रसाद ही मिळाला, तर काही लोकांच्या बाईकही जप्त करण्यात आल्या होत्या. मात्र आज पोलिसांनी वणीकरांचा सन्मान करत मास्कचे वाटप केले.
केवळ स. 6 ते दुपारी 3 पर्यंतच कामासाठी बाहेर निघा – वैभव जाधव
जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार मेडिकल आणि वैद्यकीय सेवा सोडून इतर जीवनावश्यक वस्तू आणि सेवेसाठी सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे याच वेळेत खरेदी करा व घराबाहेर निघा. तसेच या वेळेतही अनावश्यक बाहेर निघू नका. दुपारी 3 नंतर अनावश्यक बाहेर निघणा-या लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल – वैभव जाधव, ठाणेदार वणी पोलीस स्टेशन