प्रेमनगर परिसरात पोलिसांची धाड, एका मुलीची सुटका

जितेंद्र कोठारी, वणी: प्रेमनगर येथून देहव्यापार करणा-या एका मुलीची सुटका करण्यात आली आहे. नागपूर येथील एका सामाजिक संघटनेच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजीत जाधव व त्यांच्या पथकाने गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास प्रेमनगर येथे धाड टाकली. सदर मुलगी ही राजस्थान येथील रहिवासी असून मुलीच्या मते तिचे वय 22 आहे. मात्र ही तरुणी अल्पवयीन असल्याचा संशय सामाजिक संघटनेला आहे. तिची फसवणूक करून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. या प्रकरणी तिला देहविक्रीच्या व्यवसायात ढकलणा-या आरोपी जम्मू खान (24) रा. खरबडा मोहल्ला, वणी याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र धाड बाबत माहिती मिळाल्यानंतर तो फरार झाला आहे. 

वणीतील जत्रा मैदान रोडवर मटन मार्केट पासून काही अंतरावर व एका टॉकीजच्या बाजूला प्रेमनगर ही वारांगणा वस्ती आहे. काही दिवसांआधी पीडित तरुणी ही कामासाठी वणी येथे आली होती. मात्र त्यानंतर ती देहविक्रीच्या व्यवसायात आली. सदर तरुणी ही अल्पवयीन असून तिच्याकडून जबरदस्तीने देहविक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याची माहिती नागपूर येथील फ्रिडम फर्म या संघटनेला मिळाली. त्यावरून त्यांनी वणी पोलीस ठाण्याला याची माहिती दिली.

गुरुवारी दिनांक 13 जून रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास प्रेमनगर येथील एका झोपडीत वणी पोलिसांनी धाड टाकली. या घरातून पीडित तरुणीला ताब्यात घेण्यात आले. तिची चौकशी केली असता तिने माहिती दिली की ती कामाच्या शोधात वणीत आली होती. दरम्यान तिची आरोपी जम्मू खान याच्या सोबत ओळख झाली. जम्मू खानने चांगले पैसे मिळण्याची बतावणी करून तिला या व्यवसायात ओढले. तिला धमकावून तिच्याकडून जबरदस्ती देहविक्री करण्यास भाग पाडले. असी माहिती पीडितेने चौकशीत दिली. 

पीडिता मुलगी अल्पवयीन?
प्रेमनगर परिसरातून याआधी अनेकदा अल्पवयीन मुली आढळून आल्या आहेत. सामाजिक संघटनेच्या पुढाकारातून या अल्पवयीन मुलीची सुटका देखील करण्यात आली आहे. या प्रकरणी पीडिता ही 22 वर्षांची असल्याचे सांगत आहे. या मुलीचे वय निश्चितीकरणासाठी तिला यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. याचा अहवाल आल्यानंतरच पीडिता ही अल्पवयीन आहे की सज्ञान हे स्पष्ट होईल.

पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3,4,7 व भादंविच्या कलम 370 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी जम्मूला पकडण्यास पोलीस गेले असता तो फरार झाला होता. पोलिसांचे पथक आरोपीला पकडण्यासाठी रवाना झाले आहे. फ्रिडम फर्म संघटनेचे अशोक कुमार व सहकारी यांच्या मदतीने वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजीत जाधव यांच्या नेतृत्त्वात ही कारवाई करण्यात आली. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.