मटका अड्डा, कोंबडबाजारावर पोलिसांचा छापा
'वणी बहुगुणी'च्या बातमीचा इम्पॅक्ट, अवैध व्यावसायिकांचे दणाणले धाबे
रफीक कनोजे, झरी: उपविभागीय पोलीस अधिकारी लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने शिबला येथील आश्रम शाळेजवळ चालु असलेल्या मटका काउंटर वर छापा टाकला. यात एका इसमाला अटक करण्यात आली असूव त्याच्याकडून नगदी १८१० रुपये, मटका लिहण्याचे साहित्य , मटका पट्ट्या बिलबुक व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
‘वणी बहुगुणी’ या न्यूज पोर्टलला ‘दिग्रस पुल बनले तस्करीचे प्रमुख केंद्र’ या शीर्षकाखाली बातमी आली होती. यात पाटण पोलीस ठाण्याअंतर्गत क्षेत्रातील अवैध धंद्यावर प्रकाश टाकला होता. ह्या बातमीची दखल घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे वणी यांनी त्यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. डीबी पथकाला आदेश मिळताच झरी तालुक्यातील शिबला येथील शासकीय आश्रम शाळेच्या बाजुला सुरु असलेल्या मटका काउंटरवर धाड टाकुन प्रवीण मेश्राम (शिबला) हा मटका पट्टीवर आकडे लिहताना मिळाला.
आरोपीकडून नगद १८१० रुपये मटका लिहण्याचे साहित्य , मटका पट्ट्या बिलबुक व इतर साहीत्य जब्त करुन जुगार ॲक्ट नुसार कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र भुते, संतोष कालावेलवार, आशिष टाले, व इतर कर्मचार्यानी ही कारवाई केली.
कोंबडबाजावर पाटण पोलिसांची धाड
पाटण पोलिसातर्फे अंबाझरी (खुर्द) शिवारात कोंबड बाजार वर छापा टाकण्यात आला. सदर छाप्प्या मध्ये पाच आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी तीन मोटर सायकल, किंमत एक लाख रुपये व एक कोंबडा किंमत पाचशे रुपये असा एकूण एक लाख पाचशे रू चा मुद्देमाल जप्त केला. सदर कार्यवाही पाटण ठाणेदार शिवाजी लष्करे, ज्ञानेश्वर सोयाम, अमोल आनेरवार, सुभाष मेश्राम, जया रोगे, प्रमोद जिद्दवाड यांनी केली.
शिबला येथील मटका काउंटरवर धाड पडली तेव्हा मुख्य मटका संचालक फरार झाला. या मटका संचालकाचे शिबला, माथार्जुन व झरीला मिळून तीन मटका काउंटर सुरु होते. शिबला येथे धाड पडताच माथार्जुन, पाटण, शिबला व झरी येथील पाच ही मटका काउंटर बंद झाले. पाचही मटका काउंटर चे मुख्य संचालक कोण आहे ह्याची माहिती पाटण पोलीसांना व डीबी पथकाला सुद्धा असुन नोकरांवर कार्यवाही करुन चोर सोडुन संन्याश्याला फासावर लटकवण्याचे प्रकार पोलिसांद्वारे होत आहे हे उल्लेखनीय आहे. त्यामुळे डिबी पथकाची कारवाई सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आहे.
सध्यातरी डि बी पथकाच्या व पाटण पोलिसांच्या कारवाईच्या दहशती मुळे मटका संचालकांचे धाबे दणाणले असुन त्यांनी आपले मटका काउंटर बंद केले आहे. ह्यापुढे जर भविष्यात मटका काउंटर सुरु झाले तर मुख्य मटका संचालकावर कारवाई करुन त्याना तडीपार करण्यात यावे अशी मांगणी महिलावर्ग करीत आहे.