पिंपरी-महाकालपूर परिसरातील कोंबड बाजारावर पोलिसांची धाडसी कारवाई

5 जणांना अटक, साडे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

0

विवेक पिदूरकर, शिरपूर: मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी कायर लगतच्या पिंपरी – महाकालपूर शिवारातील कोंबड बाजारावर दि. 29 रविवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास धाड टाकली. यावेळी मुद्देमालासह पाच व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. तर अन्य व्यक्ती पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.

प्राप्त माहितीनुसार वणी तालुक्यातील कायर परिसरात कोंबड बाजार भरत असल्याची माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी साधा गणवेश धारण करून सापळा रचला. पोलीस आल्याची चाहूल लागताच कोंबड बाजारातील हौसी सैरावैरा पळू लागले. मात्र पोलिसांनी पाच जणांना पाठलाग करून पकडण्यात यश आले.

जीवन राजकुमार काकडे (28), संदीप वामनराव बांदूरकर (28), सुभाष लटारी लोडे (45), भास्कर मरोबा वाघोसे (47), मारुती बापूराव खंडाळकर (60) रा. पिंपरी असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. घटनास्थळावरून नऊ दुचाकी, मोबाईल, पाच जिवंत कोंबडे, एक मृत कोंबडा, रोख रक्कम असा पाच लाख 44 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम (12 अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

त्याच मार्गावरील अवैध दारूविक्री पोलिसांना दिसलीच नाही !
शिरपूर पोलिसांनी पिंपरी-महाकालपूर परिसरात चालणा-या कोंबड बाजारावर धाड टाकली. मात्र त्याच रस्त्यावरील एका मंदिरा लगत अवैध दारू विक्री सुरू असते. गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या दारू विक्रीचा हा धंदा राजरोसपणे सुरू आहे. मात्र धाड मारायला जाताना पोलिसांना ही अवैध दारू विक्री न दिसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सदर कारवाई  पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक के.ए.धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूरचे ठाणेदार सचिन लुले, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धावळे, पोलीस अमोल कोवे, अभिजित कोशतवार, निलेश भुसे, संजय खांडेकर, राजू शेंडे यासह होमगार्ड संदीप, कैलास, आणि गणेश यांनी पार पाडली.

हे पण वाचा…

आज कोरोनाचे 7 रुग्ण, शहरात रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ

हे पण वाचा…

अखेर पिसाळलेला कुत्रा ठार

Leave A Reply

Your email address will not be published.