रासा जंगलातील कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

5 आरोपींना अटक, 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: आज दुपारी वणी पोलिसांच्या पथकाने रासा जंगल परिसरात चालणा-या एका कोंबड बाजारावर धाड टाकली. या धाडीत 5 जणांना अटक करण्यात आली असून 4 मोटार सायकल, मोबाईल, रोख रक्कम, काती असा सुमारे 1 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शंकर महादेव वरपटकर (43), प्रकाश उर्फ भट्ट्या नामदेव पेचे (36), मदन बापुराव बोबडे (30), देवराव शामराव अस्वले (60), बापूजी नामदेव तांदूळकर (62) रा. रासा, वणी, कोलगाव यांना अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की आज बुधवारी दिनांक 22 सप्टेंबर रोजी तालुक्यातील रासा येथील जंगलात कोंबडबाजार भरला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना खबरीकडून मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास रासा गावाच्या पश्चिम दिशेला असलेल्या तलावाजवळील भवानी माता मंदिराजवळ धाड टाकली. तिथे त्यांना काही व्यक्ती कोंबड्याच्या झुंजीवर पैसे लावताना आढळून आले.

पोलिसांची धाड पडताच तिथे एकच गोंधळ सुरू झाला. लोकांनी मिळेल त्या दिशेने पळायला सुरुवात केली. मात्र यात 5 जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले. तर काही जण मोटारसायकल घटनास्थळी सोडून जंगलात पळून गेले. या प्रकरणी पोलिसांनी 3 दुचाकी ज्याची किंमत 135000 रुपये, 4 हजारांची रोख रक्कम, 4 कोंबडे ज्याची किंमत 1150 रुपये, 9 धारदार काती ज्याची किंमत 1800 रुपये, 4 मोबाईल ज्याची किंमत 9000 रुपये असा एकूण 150950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के यांच्या आदेशावरून सहा. पोलीस निरीक्षक आनंद पिंगळे, हेड कॉन्स्टेबल सुदर्शन वानोळे, अनंता इरपाते, वासुदेव नारनवरे, नापोका. अशोक टेकाडे, हरींदर भारती, पोलीस कॉन्स्टेबल पंकज उंबरकर, विशाल गेडाम, मो. वसीम, शंकर चौधरी, दीपक वांड्रसवार यांनी पार पाडली.

हे देखील वाचा:

वारे नगरपालिकेचे भाग 3 

…आणि हत्याकांडात आले तत्कालीन नगराध्यक्षांचे नाव

निर्गुडा नदीच्या पुलावरून एका इसमाने घेतली उडी

Comments are closed.