जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या मोहदा येथे अवैधरित्या सुरु जुगार अड्ड्यावर आज पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 6 जणांना अटक करण्यात आली असून 1 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी ही कारवाई वेश पालटून केली.
आज दिनांक 24 मार्च रोजी मोहदा परिसरात स्टोन क्रॅशरच्या मागे नाल्याजवळ काही इसम पत्ताचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती शिरपूरचे ठाणेदार सचिन लुले यांना मिळाली. माहितीवरून पोलिसांच्या तीन पथकांनी शेत मजुरांचा वेश धारण केला व घटनास्थळी पोहोचले. तिथे त्यांना 9-10 इसम पत्त्याद्वारे जुगार खेळताना आढळुन आले.
जुगार सुरू असल्याचे आढळतात मजुरांच्या वेशात असणा-या पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली. पोलिसांची धाड पडताच तिथे एकच खळबळ उडाली व पळापळ सुरू झाली. 3 ते 4 लोक झाडं झुडपांची मदत घेत पळून जाण्यास यशस्वी झाले. तर 6 इसमांना पोलिसांनी अटक केली.
महादेव रोगे (58), रवींद्र पासवान (39), परमेश्वर कुळमेथे (35), सुरेश टेकाम (51), पवन राऊत (30), सर्व रा. मोहदा व संतोष ठावरी (35) रा. कृष्णानपूर असे अटक करण्यात आलेल्यांचे नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून रोख 28 हजार 320 सह 2 मोटरसायकल व 5 विविध कंपनीचे मोबाईल अशा एकूण 1 लाख 80 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपींवर मुंबई जुगार कायदा अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सपोनि सचिन लुले, पोउपनी कांडुरे, नापोकां घोडाम, दिवेकर, पाटील, सुरपाम पोलीस शिपाई गजू सावसाकडे होमगार्ड सागर वाढई यांनी पार पाडली.
शिरपूर पोलिसांनी वेश पालटून केलेल्या कारवाईचे कौतुक होत आहे. परिसरात चालणा-या सेक्स रॅकेट विरोधात अशीच कारवाई वणी पोलिसांनी करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हे देखील वाचा: