सालेभट्टी प्रकरणात तक्रारदारांवर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न
प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यास आमरण उपोषण, तक्रारदारांचा इशारा
जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव तालुक्यातील आदिवासी बहुल गाव सालेभट्टी येथे 2017 पासून विविध योजनेंतर्गत करण्यात आलेले विकास कामे ही निकृष्ट दर्जाचे झाल्याचा गावक-यांचा आरोप आहे. निकृष्ट काम करूनही त्याच ठेकेदाराला पुन्हा ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत काम देण्यात येणार असल्याचे कळताच स्थानिकांनी आक्रमक धोरण अवलंबले व याबाबत बीडीओ, सीईओ व आमदारांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. मात्र दुस-याबाजूने राजकीय पुढा-यांनी ‘झालं गेलं विसरून’ हे प्रकरण ‘मॅनेज’ करण्यासाठी तक्रारदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे. पण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यास आमरण उपोषण केले जाईल असा इशारा तक्रारदारांनी दिला आहे.
सन 2017 पासून सालेभट्टी येथे विविध विकासकामे करण्यात आले. यात सिमेंट काँक्रेट रस्ते, भूमिगत नाली, व्यक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, सौंदर्यीकरण इत्यादी कामांचा समावेश आहेत. मात्र सदर कामे निकृष्ठ असूनही ठेकेदारांचे लाखो रुपयांचे बिल काढण्यात आले. सदर ठेकेदार हा ग्राम पंचायत सदस्याचा नातलग असून त्यामुळेचे निकृष्ट दर्जाचे काम करूनही वारंवार वारंवार त्यालाच कामे दिली जात असल्याचा आरोप गावक-यांचा आहे.
आदिवासीबहुल गावांचा विकास करण्यासाठी शासनाद्वारे ठक्कर बाप्पा हा कार्यक्रम राबविला जातो. या वस्ती सुधारणा कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायतीला विशेष निधीही दिला जातो. ठक्कर बाप्पा कार्यक्रमांतर्गत 2020-21 या कालावधीसाठी आधीच्याच निकृष्ट दर्जाचे काम करणा-यां ठेकेदारालाच काम देण्यात येणार असल्याचे कळताच गावकरी आक्रमक झाले व त्यांनी याला आक्षेप घेत याबाबत याबाबत बीडीओ, सीईओकडे तक्रार करीत आमदारांनाही याबाबत निवेदन दिले.
वरुड गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सालेभट्टी येथे सन 2016 -17 ते सन 2020-21 या कालावधीतील शासनाच्या विविध विकास योजनेतील कामांची पारदर्शक चौकशी करून कारवाई करण्यात यावी. तसेच ग्रा.प.सद्स्याचे नातलग असलेल्या ठेकेदाराला पुढील कामे देण्यात येवू नये. अशी मागणी गावक-यांची आहे.
…तर आमरण उपोषण केले जाईल !
आक्रमक होताच प्रशासनाने याचे चौकशीचे आदेश दिले. दुसरीकडे प्रकरण अंगलट येऊन मोठे आर्थिक नुकसान होण्याच्या भीतीतून राजकीय पुढा-यांनी तक्रारदारांवर दबाव टाकून प्रकरण मॅनेज करण्याचा घाट घातला आहे. मात्र भ्रष्टाचारामुळे गावाचा विकास खुंटत असल्याने कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याची भूमिका तक्रारकर्त्यांनी घेतली आहे. जर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची भनक जरी लागली तर आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा तक्रारकर्त्यानी दिला आहे.
सामाजिक कार्यकर्ते गंगाधर महाराज लोनसावळे यांचेसह बालाजी टेकाम, शंकर बोन्द्रे, नानाजी येरणे, डोंडू कोरझारे, गणेश लोनसावले व सालेभट्टी ग्रामवाशीयांतर्फे याप्रकरणी तक्रार देण्यात आली होती.
हे देखील वाचा:
दारु तस्करांची अनोखी शक्कल, गाडीच्या बोनेटमध्ये लपवून तस्करी