विवेक तोटेवार, वणी: वणीतील टिळक चौक येथील मुख्य पोस्ट ऑफिस फक्त नावापुरतेच उरल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील महिन्यात राऊटरमध्ये समस्या आल्याने जवळपास 15 दिवस पोस्टातील सर्व ऑनलाइन व्यवहार बंद होते. यामुळे पोस्टातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन साठी फार त्रास सहन करावा लागला. यासोबतच गावखेड्यातून आरडी, विद्युत बिल, पेन्शन या कामासाठी येणाऱ्याची फार दमछाक झाली. पंधरा ते वीस दिवसानंतर समस्या सुटली व नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू झाले. पण कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे
पोस्टामध्ये कर्मचाऱ्याच्या कमतरतेमुळे एकाच कर्मचाऱ्यास दोन काउंटर सांभाळावे लागत आहे. त्यातच वीजबिल घेण्यासाठी कर्मचारी हजर नसल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत पोस्ट मास्टर दुबे याना विचारणा केली असता कर्मचारी ट्रेंनिग साठी बडोदा गेले असल्याने ही समस्या होत असल्याचं त्यांवी सांगितलं. पण ग्राहकांना जो त्रास होतो त्याचे काय याचे उत्तर मात्र त्यांना देता आले नाही. मंगळवारी अनेक ग्राहक मासिक बचत योजनेचे पैसे भरण्याकरिता आले होते. सोबतच रजिस्टर ,वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांची रांग लागलेली होती. शेवटी कर्मचारी नसल्याने अनेकांनी परत घरी जाण्यातच धन्यता मानली.
या समस्येवर मात करण्यासाठी काहीतरी व्यवस्था करावी अशी मागणी ग्राहक करत आहे. पोस्ट मास्तर यांच्या म्हणण्यानुसार वणी पोस्ट ऑफिसने याबाबत ई-मेल द्वारे यवतमाळ डिव्हिजण ऑफिसला कळविले परंतु अजूनही कुणाचीही नेमणूक करण्यात आली नाही. वणी पोस्टमध्ये अधिकचे तीन कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. परंतु आहे त्यातच काम भागविणे सुरू आहे. याचा त्रास इतर कर्मचाऱ्यांना होतो त्यांना रात्री 12 वाजेपर्यंत काम करावे लागते. याबाबत सविस्तर माहिती यवतमाळ डिव्हिजन ऑफिसला आहे. परंतु कोणत्याही प्रकारची व्यवस्था मात्र केल्या जात नाही अशी खंत यावेळी पोस्ट मास्तर दुबे यांनी व्यक्त केली.