नागेश रायपुरे, मारेगाव: प्रशासनाने फक्त कागदोपत्री मागण्या मंजूर केल्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन मागे घेण्यास प्रशासनाने मजबूर केले. मागण्या पूर्ण मंजूर झाल्याशिवाय मी मागे हटणार नाही. जनतेच्या हितासाठी माझा लढा चालूच ठेवील. असे प्रतिपादन समाजसेवक पुंडलिक साठे यांनी केले, ते स्थानिक विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
तालुक्यातील शेतकरी, शेतमजूरांच्या हितातील वनजमिनीचे पट्टे मिळण्याबाबत, अतिक्रमण जागेवर झोपडपट्टी बांधून राहणाऱ्या गरिबांना घरकुल मिळण्यात यावेत. वन्य प्राण्यांपासून झालेल्या नुकसानीची भरपाई बाबत. शहरातील नाल्या, रस्ते, वीजेबाबत तसेच नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळण्याबाबत.
संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना रखडलेले अनुदान तात्काळ मिळण्याबाबत, तसेच कापसाला 9 हजार तर सोयाबीनला 5 हजार भाव मिळण्याबाबत, आदी विवीध मागण्या घेऊन साठे यांनी 20 ऑक्टोंबर रोजी येथील तहसील कार्यालय समोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे निवेदनाद्वारे कळविले.
आंदोलनाच्या आधीच 7 ऑक्टोंबर रोजी येथील तहसील कार्यालयात वनविभाग, नगरपंचायत, पंचायत समिती, महसूल विभाग प्रशासनाची बैठक घेऊन कागदोपत्री काही मागण्या मंजूर करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. त्यामुळे साठे यांनी पत्रकार परिषद घेऊन मागण्या पूर्ण मंजूर केल्याशिवाय मी मागे हटणार नाही असे प्रतिपादन पत्रकार परिषदेत केले.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)